वेळगेतील आयुष इस्पितळ येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2024 09:08 AM2024-08-19T09:08:51+5:302024-08-19T09:09:39+5:30
३८ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, रविवारी वेळगे येथे आयुष इस्पितळासाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीची भेट देऊन पाहणी केली. याचे ३८ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च २०२५ पर्यंत ते पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
साधारणतः ५० खाटांची सोय असलेल्या या इस्पितळात शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा असणार आहे. आयुष, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, योगासने आदींची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) असतील. तेथे रुग्ण भेट देऊन उपचार करून घेऊ शकतील. पंचकर्मा, वीरेचन, नास्य, अभ्यंग, योगासने, ध्यानधारणा याद्वारे उपचारांची सोय असणार आहे. अशाच प्रकारचे ५० खाटांचे आयुष इस्पितळ मोतिडोंगर, मडगाव येथेही उभारण्यात येणार आहे. धारगळ येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या आयुष इस्पितळाचे ८ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटन झाले. इस्पितळ पूर्ण वेगाने सुरू आहे. तेथे दररोज ५०० रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात.
राज्यात २० वेलनेस सेंटर्स
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सव्वा लाख 'वेलनेस सेंटर्स' जाहीर केली. त्यातील १२,५०० आयुष वेलनेस सेंटर्स आहेत. गोव्याला अशी २० केंद्रे मंजूर झालेली आहेत. लोकांना दारात आरोग्य सेवा मिळाल्याने आता कोणीही व्यक्ती आजार अंगावर काढणार नाही तर थेट वेलनेस सेंटरमध्ये जाईल.'
गोवा वैद्यकीय पर्यटन उपक्रमांचे केंद्र बनेल
श्रीपाद नाईक हे केंद्रात आयुषमंत्री असताना त्यांनी उत्तर गोव्यात वेळगे व दक्षिण गोव्यात मोती डोंगर (मडगाव) येथे आयुष इस्पितळे मंजूर केली होती. नाईक यांच्याकडे आता हे खाते नाही. ते केंद्रात ऊर्जा राज्यमंत्री आहेत. श्रीपाद यांना या प्रकल्पांबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'माझ्याकडे आयुष खाते असताना देशभरात मी ११९ आयुष इस्पितळे मंजूर करून घेतली होती. गोव्याला दोन इस्पितळे मंजूर केली. शिवाय धारगळ येथील पूर्ण क्षमतेचे आयुष इस्पितळ माझ्याच पुढाकाराने झालेले आहे, तेथे ओपीडींमध्ये रोज मोठ्या संख्येने रुग्ण येतात. वेळगे येथील इस्पितळास काही कारणामुळे थोडा विलंब झाला. परंतु आता ते पूर्णत्वास येत आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. गोवा राज्य वैद्यकीय पर्यटन उपक्रमांचे केंद्र बनेल, असा विश्वास मला आहे.'