गोवा रोगमुक्त, नशामुक्त करणे ध्येय: रामदेव बाबा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:22 PM2023-02-18T13:22:12+5:302023-02-18T13:22:52+5:30

गोव्यात येताना वेगळी ऊर्जा घेऊन आलोय, असे प्रख्यात योग गुरू रामदेव बाबा यांनी सांगितले.

baba ramdev said to make goa disease free drugs free goal | गोवा रोगमुक्त, नशामुक्त करणे ध्येय: रामदेव बाबा 

गोवा रोगमुक्त, नशामुक्त करणे ध्येय: रामदेव बाबा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'सनातन धर्माच्या महाशिवरात्रीसारख्या पावन सणादरम्यान राज्यात सनातन जीवन मूल्यांवर आधारित तीनदिवसीय योग शिबिराचे आयोजन होत आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे. गोव्याशी माझा नेहमीच आत्मीय संबंध राहिला आहे. गोव्यात येताना वेगळी ऊर्जा घेऊन आलोय, असे प्रख्यात योग गुरू रामदेव बाबा यांनी सांगितले.

पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वामी परमार्थ देव, साध्वी देव प्रिया, डॉ. एन. पी. सिंग आणि कमलेश बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 'आमच्या डीएनएमध्ये योग आहे, रोग नाही, हे सर्वांत आधी सर्वांनी लक्षात घ्यावे. आगामी तीन दिवसांत योगाच्या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, अल्झायमर यासारख्या अनेक रोगांच्या विळख्यातून लोकांना मुक्त करण्यासाठीच मी गोव्यात आलो आहे. कुठलीही गोळी न देता फक्त योगाच्या माध्यमातून लोकांना रोगमुक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेली ३५ वर्षे मी योग करत आहे. माझे वय जरी पन्नाशीच्या आसपास असले तरी योग नियमित केल्याने बायोलॉजिक वय माझे २५ ते २८ वर्षांमध्ये आहे,' असे रामदेव बाबा यांनी सांगितले.

दरम्यान, योग शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पतंजली आयुर्वेद हरिद्वारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण, तपोभूमी कुंडईचे पीठाधीश पद्मश्री ब्रम्हेशानंद स्वामी महाराज यांची शिबिरास उपस्थिती असेल. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा 'सनातन संगीत महोत्सव' होणार आहे. भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत व पतंजली किसान सेवा समितीकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आज शनिवारी पहाटे ५ ते ७.३० या वेळेत मिरामार येथे योग शिबिर होईल. त्यानंतर १०.३० वाजता गोशाला दर्शन, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी साडेसहा वाजता सत्संग होणार आहे.

पतंजली वेलनेस केंद्र गोव्यात आणण्याचा विचार

'देशातील उत्तरेकडील सर्वात मोठे पतंजली वेलनेस केंद्र गोव्यात आणण्याची माझी इच्छा आहे. येत्या तीन दिवसांतील सकारात्मक प्रतिसाद पाहिल्यानंतर योग्य काय तो निर्णय घेऊ. तोपर्यंत ज्या प्रकारे राज्यात पतंजलीची मुळे आहेत, त्यांच्यातर्फे कार्य सुरूच राहील; पण सध्या राज्यातील लोकांना रोग मुक्त आणि नशा मुक्त करणे हेच ध्येय आहे' असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी खास शिबिर

'समाजात सध्या मोठ्या प्रमाणात अश्लीलता दाखविण्यात येत आहे. चित्रपट, वेब सिरीज या सर्व अश्लीलतेला केंद्रित करूनच दाखविले जात आहे. युवा पिढी यामध्ये भरकटत चालली आहे. नवचेतना, ऊर्जा, मातृभूमी व पालकांप्रती प्रेम तयार करण्यासाठी शनिवारी सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत खास संगीत महोत्सव आयोजित केला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी खास योग शिबिराचे आयोजन आम्ही या तीन दिवसांमध्ये केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: baba ramdev said to make goa disease free drugs free goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.