तिसवाडीत बाबूश हरले आणि जिंकलेही...
By admin | Published: March 12, 2017 02:26 AM2017-03-12T02:26:28+5:302017-03-12T02:26:41+5:30
पणजी : तिसवाडी तालुक्यातील पणजी या महत्त्वाच्या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा पराभव झाला. भाजपसाठी ते यश आहे;
पणजी : तिसवाडी तालुक्यातील पणजी या महत्त्वाच्या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा पराभव झाला. भाजपसाठी ते यश आहे; पण तिसवाडीतील अन्य मतदारसंघांमध्ये बाबूश फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. बाबूशचे तीन उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर यांच्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत आता प्रथमच भाजपचा विजय झाला.
सांताक्रुझ मतदारसंघात बाबूशने टोनी फर्नांडिस यांना काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले होते. टोनी हे कमकुवत उमेदवार होते; पण काँग्रेसच्या तिकिटामुळे टोनी विजयी झाले. बाबूश हे सांताक्रुझचे माजी आमदार आहेत. आपण बाबूशसोबत आहोत, असे विधान मतमोजणी पूर्ण होताच लगेच टोनी फर्नांडिस यांनी केले. बाबूशच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांचा ताळगावमध्ये प्रभाव नव्हता. जेनिफर पराभूत होतात, अशी चर्चा मतदानानंतरही सुरू होती. मात्र, बाबूश यांचा स्वत:चा ताळगाव मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भाजपचे दत्तप्रसाद नाईक यांचा ताळगावमध्ये पराभव झाला. जर ताळगावमध्येही बाबूशच्या पत्नीचा पराभव झाला असता तर मोन्सेरात यांच्यासाठी तो फारच मोठा धक्का बसला असता. सांतआंद्रे मतदारसंघात फ्रान्सिस सिल्वेरा हे विजयी झाले. मोन्सेरात यांनी सांतआंद्रेमध्ये सिल्वेरा यांनाच तिकीट द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडे केली होती. बाबूशचे काँग्रेससोबत जमले नाही तर काँग्रेसचे तिकीट घेणार नाही, असे सिल्वेरा हे प्रारंभी लुईझिन फालेरो यांना सांगत होते. ताळगाव, सांताक्रुझ व सांतआंद्रे हे तीन मतदारसंघ काँग्रेसमधील बाबूश समर्थकांनी जिंकले. सांताक्रुझ हा मतदारसंघ बाबूशसाठी बोनस ठरला. तिथे भाजपनेही बऱ्यापैकी मते प्राप्त केली.
पणजीत बाबूश मोन्सेरात स्वत:चा विजय घडवून आणू शकले नाहीत. आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी बाबूशला पराभवाचे पाणी पाजले. १९९४ सालापासून तिसवाडीतील पणजी हा मतदारसंघ अखंडितपणे कायम भाजपसोबत राहिला आहे. तिसवाडीतील पाचपैकी तीन मतदारसंघ आज काँग्रेसकडे आहेत तर दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. २०१२ सालच्या निवडणुकीतही तिसवाडीतील पणजी व सांतआंद्रे हे दोन मतदारसंघ भाजपकडे गेले होते. या वेळी भाजपकडे पणजी व कुंभारजुवे गेले. सांतआंद्रेत मात्र या वेळी भाजपचा प्रभाव पडला नाही. (प्रतिनिधी)