बाबूशचा 'स्मार्ट' हल्लाबोल; काम निकृष्ट झाल्याचा आता साक्षात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:53 PM2023-05-25T12:53:51+5:302023-05-25T12:55:28+5:30
सल्लागारावर ठपका.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'स्मार्ट सिटी'च्या कामाबाबत आतापर्यंत टीका करणाऱ्या लोकांना धीर धरण्याची भाषा करणारे पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना आता ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या 'स्मार्ट' कामांचे खापर कन्सल्टंटवर फोडले आहे. मोन्सेरात यांनी काही दिवसांतच आपल्या विधानावरून यू- टर्न घेतल्याने आता त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.
स्वतः स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाचे घटक असलेले बाबूश मोन्सेरात यांनी धक्कादायक विधान करताना स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट असल्याचे म्हटले आहे. केवळ कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगून ते थांबले नाहीत तर काहीच ज्ञान नसलेल्यांना आठ कोटी रुपयांची कन्सल्टन्सी देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नेमका कोणत्या कन्सल्टंटच्या बाबतीत त्यांनी हा खुलासा केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांची नियुक्ती केल्यानंतर मोन्सेरात हे विसंगत सूर लावत असल्याचे त्यांच्या अलीकडील विधानांवरून दिसत आहे. अलीकडेच उद्योजक मनोज काकुलो यांनीही या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
१३ वाहने रुतली
स्मार्ट सीटी कामांमुळे पणजीत जागोजागी खोदलेले खड्डे अजून तसेच आहेत. आतापर्यंत ट्रक, पाणीवाहू टॅकसह १३ वाहने या स्मार्ट सिटीच्या खड्डयात रुतण्याचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे अजूनही पणजीतून जाताना टँकरचालक तसेच इतर मोठ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत.
आतापर्यंत काय घडले?
पावसात पणजीही बुडणार असल्याची भीती लोक व्यक्त करीत असतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल आणि महापौर रोहित मोन्सेरात यांनी मान्सूनमध्ये पणजी बुडणार नाही, हे सांगता येत नाही. म्हणून यापूर्वीच हात झटकले होते. त्यानंतर जनक्षोभ लक्षात घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयएएस अधिकारी संजित रॉड्रिग्स यांना स्मार्ट सिटीच्या सर्व कामांची सूत्रे सोपवून त्यांना सीईओ म्हणून नियुक्ती केली होती. आता मुख्यमंत्रीही स्मार्ट सीटीच्या कामाची जातीने पाहणी करीत आहेत. मंगळवारी रात्री ९:३० वाजताही मुख्यमंत्री सांतिनेज येथील कामांची पाहणी करण्यासाठी गेले होते.
आरोप की कबुली?
बाबूश मोन्सेरात हे आता स्मार्ट सिटी कामांवर टीका करीत असले तरी ते स्वत: इमेजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे एक संचालक आहेत. शिवाय महापौर असलेले त्यांचे पुत्र रोहित मोन्सेरात हेही संचालक आहेत. स्मार्ट सिटी संदर्भातील सर्व कामे ही मोन्सेरात द्वयींच्या सूचनावरूनच केली जात होती. त्यामुळे मोन्सेरात आता ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे आरोप करतात की, कबुली देतात हेही समजणे कठीण आहे. परंतु कन्सल्टंटवर खापर फोडून जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार असल्याचेही बोलले जात आहे.
आमदारकी सोडून घरी बसा : उत्पल पर्रीकर
'स्मार्ट सिटी'च्या कामांबाबत पिता-पुत्र गंभीर नसल्याचे आज पुन्हा उघड झाले आहे. आमदार मोन्सेरात यांना जबाबदारी पेलत नसेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन घरी बसावे, असा तिखट सल्ला उत्पल पर्रीकर यांनी दिला आहे. पणजीतील रस्त्यांमध्ये आतापर्यंत १३ हून अधिक वाहने रुतली. त्यावरूनच या कामांचा दर्जा हा निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते. मोन्सेरात १३ हून अधिक घटना घडूनही गप्प बसले. आता त्यांना कामे निकृष्ट झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. हे केवळ जबाबदारी झटकण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. स्मार्ट सिटीची ज्या पद्धतीने कामे सुरू आहेत, त्यावर आपण सुरुवातीपासूनच चिंता व्यक्त करीत होतो, याची आठवणही पर्रीकर यांनी यावेळी करून दिली.