भाजपतर्फे घर वापसी
By admin | Published: September 29, 2015 01:47 AM2015-09-29T01:47:58+5:302015-09-29T01:48:28+5:30
पणजी/डिचोली : विधानसभेच्या २०१२च्या निवडणुकीपूर्वी ज्यांनी भाजपला रामराम ठोकला होता, ते माजी आमदार राजेश पाटणेकर तसेच दयानंद सोपटे यांचा
पणजी/डिचोली : विधानसभेच्या २०१२च्या निवडणुकीपूर्वी ज्यांनी भाजपला रामराम ठोकला होता, ते माजी आमदार राजेश पाटणेकर तसेच दयानंद सोपटे यांचा भाजपमध्ये फेरप्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे. भाजपचे पूर्वीचे पदाधिकारी सत्यविजय नाईक (नावेली) आणि तुळशीदास गावकर (अडवलपाल) अशा काहीजणांना पुन्हा भाजपमध्ये स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की पाटणेकर व सोपटे यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे. मात्र, निर्णय झालेला नाही. सत्यविजय व तुळशीदास गावकर यांच्याबाबतही पक्ष विचार करत आहे. काणकोणचे माजी आमदार विजय पै खोत यांनी मात्र भाजपमध्ये फेरप्रवेशासाठी अजून पक्षाशी संपर्क केलेला नाही. अन्य काही माजी आमदारही भाजपमध्ये येऊ इच्छितात.
पाटणेकर डिचोली मतदारसंघातून दोनवेळा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. मात्र, २०१२च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अधिकारावर होते. पाटणेकर व सोपटे यांनी आमदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने डिचोली व मांद्रे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली होती. २०१२च्या निवडणुकीवेळी दोघांनाही काँग्रेसची उमेदवारी मिळाली व दोघांचाही पराभव झाला. सोपटे यांनी यापूर्वीच काँग्रेस पक्ष सोडला होता; पण त्यांचा भाजपमध्ये प्रवेश रोखला होता. तो आता होणार आहे.
पाटणेकर यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस हाउसमध्ये पाठवून दिला. डिचोलीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये ते अस्तित्वहीन बनले होते. येत्या २ आॅक्टोबर रोजी ते भाजपमध्ये फेरप्रवेश करू शकतात. पाटणेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे डिचोलीतील राजकीय समीकरणे थोडी बदलतील. पाटणेकर यांची राजकीय ताकद पूर्वीसारखी राहिलेली नसली तरी, ते कायम लोकांत मिसळणारे आहेत. भाजपमधील शिल्पा नाईक गटाचा पाटणेकर यांना तीव्र विरोध आहे; पण पक्षाने त्या विरोधाची पर्वा केलेली नाही. सोपटे यांनी २०१२ची निवडणूक मांद्रे मतदारसंघातून आताचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरुद्ध लढवली होती; पण आता सोपटे यांना भाजपमध्ये घेण्यास पार्सेकर यांचा विरोध नाही. सोपटे यांना मतदारसंघ मात्र नसेल.
आॅक्टोबरमधील पालिका निवडणुका आणि त्यानंतर २०१६ किंवा २०१७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने घर वापसी मोहीमच सुरू केली आहे. काही ख्रिस्तीधर्मीय नेते व काही हिंदूधर्मीय माजी आमदारांना पक्षासोबत ठेवणे हे काँग्रेसला आणि म.गो. पक्षालाही शह देणारे ठरेल, असा विचार भाजपमधील एका मोठ्या गटाने केला आहे. विरोधकांना विविध प्रकारे गारद करतच पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, अशा प्रकारची सत्ताधारी भाजपची रणनीती आहे. पालिका निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची खेळीही
भाजपने खेळली आहे.
(खास प्रतिनिधी)