विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्यालयांवर नजर
By Admin | Published: January 4, 2017 03:20 PM2017-01-04T15:20:55+5:302017-01-04T15:20:55+5:30
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्यालयांवर आणि मोठ्या विक्रेत्यांवर, वितरकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिका-यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 4 - गोवा विधानसभा निवडणूक येत्या 4 फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्यालयांवर आणि मोठ्या विक्रेत्यांवर, वितरकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांनी अबकारी खाते तसेच वाणिज्य कर खात्याला व पोलिसांना दिले आहेत.
गोव्यात निवडणूक आचारसंहिता बुधवारपासून लागू झाली. येत्या 11जानेवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होईल व त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास आरंभ होईल. दि. 18 जानेवारी हा उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचा दिवस आहे. उमेदवारी मागे घेण्यास शेवटची मुदत 21 जानेवारी रोजी आहे. 4 फेब्रुवारी रोजी मतदान होईल व 11 मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
विद्यामान गोवा विधानसभेसाठी यापूर्वी मार्च क्रमांक 12 मध्ये निवडणूक झाली होती. यावेळी भाजप, काँग्रेस, म.गो. पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि आम आदमी पक्ष या पाच पक्षांमध्येच खरी लढत होणार आहे. 2012 साली आम आदमी पक्ष रिंगणात नव्हता. तसेच गोवा सुरक्षा मंचाचा जन्मही झाला नव्हता. 2012 साली भाजप व म.गो. यांच्यात युती होती व लोकांनी युतीचे सरकार निवडून दिले होते.
यावेळी भाजप व म.गो. हे विभक्त झाले असून ते स्वतंत्रपणो लढत आहेत. काँग्रेस पक्ष अन्य छोट्या पक्षांशी युती करण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसने यावेळी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नव्या चेह-यांना उमेदवारी देण्याचे तत्त्वत: ठरवले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ सध्या 21 आहे. काँग्रेसचे संख्याबळ नऊवरून सहार्पयत खाली आलेले आहे. काँग्रेसच्या दोघा नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली व निवडणुकीची प्रक्रिया चांगल्या प्रकारे व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे जाहीर केले. गोव्याची मतदार संख्या एकूण सुमारे अकरा लाख असून त्यात चाळीस हजार मतदार हे अठरा ते एकोणीस वर्षे वयोगटातील आहेत. त्यांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. एकूण वीस हजार अधिकारी निवडणुकीशीसंबंधित कामांमध्ये व्यस्त असतील.
मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आमिष देण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून निवडणूक यंत्रणा बरीच काळजी घेत आहे. मद्यालयांमधून मद्याची विक्री अचानक वाढलेली आहे काय हे पाहण्याचे काम अबकारी खाते करणार आहे. टीव्ही, फ्रीज, मिक्सर, कुकर अशा वस्तूंची मोठय़ा प्रमाणात एखाद्या विक्रेत्याकडून विक्री सुरू आहे का व त्याचा संबंध निवडणुकांशी आहे का हे पाहण्याचे काम वाणिज्य कर खाते करणार आहे. पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे, असे कुणाल यांनी सांगितले.
सरकारी जागेत जर कुणी पोस्टर्स लावले तर ते चोवीस तासांत काढावे लागतील. खासगी जागेत लावले तर पंचाहत्तर तासांत ते हटवावे लागतील. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करता येणार नाही. तसेच वीजेच्या खांबांसह अन्य तत्सम जागी राजकीय जाहिराती मुळीच लावता येणार नाहीत, असे कुणाल यांनी नमूद केले. गोव्यात प्रथमच निवडणुकीवेळी व्हीव्हीपीटी यंत्रे वापरली जाणार आहेत. आचारसंहिता भंगाची तक्रार आल्यानंतर लगेच त्या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे.