बांबू कॉटेज पर्यटकांसाठी मांडलेली गोव्यातील आगळी-वेगळी संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 04:51 PM2017-10-13T16:51:15+5:302017-10-13T16:51:27+5:30
गोवा म्हटले की समुद्र किनारे किंवा नयन्यरम्य असा नैसर्गिक परिसर अशी जणू संकल्पनाच झाली आहे. गोव्यात येणा-या प्रत्येक पर्यटकांच्या मनात ही संकल्पना भिनली गेली आहे.
म्हापसा : गोवा म्हटले की समुद्र किनारे किंवा नयन्यरम्य असा नैसर्गिक परिसर अशी जणू संकल्पनाच झाली आहे. गोव्यात येणा-या प्रत्येक पर्यटकांच्या मनात ही संकल्पना भिनली गेली आहे. इथला प्रत्येक भाग या संकल्पनेखाली वेगवेगळ्या प्रकारे मिळालेल्या देणगीतून व्यापला गेला आहे. त्यातून एकाच ठिकाणी या गोष्टी उपलब्ध होणे तसे कठीणच असते. मात्र आश्वे-मांद्रे या उत्तर गोव्यातील किना-वर एकाच ठिकाणी निसर्गाचे हे दोन वेगवेगळे निसर्गाचे प्रकार पहायला मिळतात. किना-यावर येणा-या लोकांसाठी तयार करण्यात आलेली बांबू कॉटेजस व त्याला लागून असलेला किनारा.
पेडणे तालुक्यातल्या मांद्रे भागातील आश्वे इथल्या किना-यावर प्रवेश केल्यानंतर बांबूपासून बनवण्यात आलेली आकर्षक, सुंदर अशी लहानशी कुटीरे (बांबू कॉटेज) पहायला मिळतात. माडांच्या गर्दीत, शांत निरागसमय वातावरणात तयार करण्यात आलेल्या या कुटीरांच्या परिसरात प्रवेश केल्यास कुळागरात प्रवेशल्या सारखे तेथील निर्मित वातावरणामुळे वाटते. या कुटीरांची संकल्पना एखाद्या गावातील चाळीतल्या संकल्पनेवर आधारीत केली आहे. परिसरात किना-यावरुन सतत वाहणारा थंडगार, शितल वारा. त्यामुळे पाराही त्याच वातावरणाला साथ देणारा असतो.
प्रत्येक कॉटेज बांबूपासून बनवण्यात आला आहे. छप्परासाठी सुकलेल्या चा-याचा वापर करण्यात आला आहे. बसण्यासाठी कुटीरांना आकर्षक बांबूचे व्हरांडे तयार करण्यात आले आहेत. ऐन पावसाळ्यातही व्हरांड्यात बसून पावसाची आनंद लुटता येतो. व्हरांड्याची शोभा वाढवण्यासाठी टांगत ठेवलेला मंद प्रकाशावर चालणारा लामण दिव्याच्या आकाराचा दिवा. चाळीतील परिसर माडांनी, शोभा वाढवणा-या इतर फूलझाडांनी फुलून गेलेला. कुटीरातील आतील भागही कुटीराच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. मात्र पर्यटकांना वापरण्यासाठी ही कुटीरे तयार करण्यात आली असल्याने इथे उपलब्ध करुन दिलेल्या या आकर्षणाला योग्य सुविधांची थोडी आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. चाळीतील प्रत्येक कुटीरांना एखाद्या फळाचे किंवा फुलाचे नावही देण्यात आले आहे.
या कुटीरापासून मिळणा-या आनंदाच्या जोडीला कुटीरापासून अवघ्या मीटरांच्या अंतरावर खवळणा-या समुद्र किना-याची जोडीला ती वसवण्यात आली आहेत. त्यामुळे कुटीरांच्या शांत वातावरणातून बाहेर पडल्यानंतर सरळ समद्राचा आनंद अनुभवायला मिळतो. कुटीरात बसल्या बसल्या मावळत्या सूर्याचे दर्शन देखील अनुभवता येते. रात्रीच्या शांत वातावरणात देखील समुद्राच्या लाटांचे स्वर साथ देत राहतात.
परिसराला शोभेल असे इटली भाषेत ‘लामोर’ अर्थात ‘प्रेम’ असे नाव देण्यात आले आहे. ही आगळी वेगळी संकल्पना अनुभवायला धाकधुकीच्या वातावरणातून दूर शांत चित्तात काही काळ व्यतीथ करण्यासाठी पर्यटक येत असतात अशी माहिती दिनेश कुमार यांनी दिली. विदेशी पर्यटकांनी तर ही संकल्पना उचलून धरली असल्याचे ते म्हणाले. आठवड्याच्या शेवटी तर पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. हंगामा सुरु झाल्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी असते. या सर्व वातावरणाला संगीताची जोडही देण्यात आली असल्याचे कुमार म्हणाले.