तणाव निर्माण होण्याची शक्यता, संभाजी भिडे यांच्या प्रवेशावर बंदी घाला; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:41 AM2023-08-23T08:41:22+5:302023-08-23T08:43:00+5:30
भिडे यांच्यावर बंदी घालण्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व मुख्य सचिवांना पत्र लिहिणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजी भिडे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या गोवा प्रवेशावर बंदी घालावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली.
संभाजी भिडे यांच्यावर अनेक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रमोद मुतालिक यांच्यावर राज्यात प्रवेश बंदी आहे. मग ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्या भिडे यांच्यावर बंदी का नाही? महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. भिके म्हणाले, की भिडे यांच्यावर बंदी घालण्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व मुख्य सचिवांना पत्र लिहिणार आहे.
जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता?
या सभेला संबोधित करण्याची परवानगी दिल्यास जातीय तेढ वाढेल आणि राज्यातील जातीय शांतता बिघडेल. राज्यात सर्व धर्माचे लोक एकमेकांचा आदर करतात. आम्ही आजपर्यंत आमचा बंधूभाव जपला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.