बाणस्तारी अपघात प्रकरण: मेघनाच्या अटकेच्या हमीनंतर जमाव माघारी; म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:56 AM2023-08-09T10:56:19+5:302023-08-09T10:58:07+5:30

लोकांच्या गर्दीने काढला पोलिसांना घाम.

banastarim accident case mobs retreat after assurance of meghna sawardekar arrest march at mhardol police station | बाणस्तारी अपघात प्रकरण: मेघनाच्या अटकेच्या हमीनंतर जमाव माघारी; म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा

बाणस्तारी अपघात प्रकरण: मेघनाच्या अटकेच्या हमीनंतर जमाव माघारी; म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क माशेल: बाणस्तारी अपघातात जीव गमावलेल्या फडते दांपत्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवाडीवासीयांनी काल सायंकाळी थेट म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक दिली.

या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करावा, तसेच अपघातास कारणीभूत मेघना सावर्डेकरला अटक करण्याची मागणी करत पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांना घेराव घातला. रात्री उशिरा पोलिसांनी मेघना हिला अटक करण्याची हमी दिल्यानंतर जमाव माघारी परतला.

सविस्तर वृत्त असे की, बाणस्तारी अपघात प्रकरणाला वेगळे वळण देण्यात येत असल्याचा आरोप करत दिवाडीवासीयांनी काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार राजेश फळदेसाई यांनी केले होते. यावेळी म्हार्दोळ पोलिस ठाण्याबाहेर जवळपास ४०० हून अधिक लोक जमले होते. अपघात होऊन ५० तास लोटले तरी या प्रकरणातील मेघना सावर्डेकर हिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सावर्डेकर दांपत्याचे राजकीय संबंध असल्याने त्यांना वाचवले जात आहे. मेघना कॅबिनेट मंत्र्याची नातेवाईक असल्यानेच पोलिस अभय देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

पोलिसांनी मेघनाला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अटक न केल्यास पुन्हा मोर्चाच इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी आमदार राजेश फळदेसाई, जि. पं. अध्यक्ष सिध्देश नाईक, अॅड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर, समील वळवईकर, तारा केरकर यांच्यासह पंच सदस्य उपस्थित होते.

परेशचा चेहरा दाखविला

पोलिसांनी अटक केलेल्या परेश सावर्डेकर याचा चेहरा दाखवा, आम्हाला तोच माणूस आहे का याची खातरजमा करायची आहे, अशी मागणी लोकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी दिवंगत फडते यांच्या काही नातेवाईकांना त्याची ओळख पटवण्याची संधी दिली. अपघात प्रकरणात जो कोणी आरोप असेल त्याला अजिबात सोडणार नाही. नंदनवन फार्म ते घटनास्थळापर्यंत प्रत्येक गोष्टीचा तपास सुरू आहे. - अभिषेक धानिया, द. गो. अधीक्षक

वकिलांची फौज उभी करू : फळदेसाई

या अपघात प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास करावा. ग्रामस्थांच्या भावनांची आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. निष्पापांचे बळी घेणाया सावर्डेकर दांपत्याला पाठीशी घालू नका. फडते कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी वकिलांची फौज उभी करू, अशी ग्वाही आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.

बाणस्तारी पुलावर झालेल्या अपघाताचा पोलिसांनी योग्य पध्दतीने तपास केलेला नाही. हा तपास जाणूनबुजून चुकीच्या दिशेने नेला जात आहे. सावर्डेकर कुटुंबाचे राजकीय हितसंबंध तसेच ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. - रामा काणकोणकर, सामाजिक कार्यकतें

या प्रकरणात मेघना सावर्डेकर हिची जबानी का घेतली नाही? तसेच तिचीही वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असताना याकडे पोलिसांनी का दुर्लक्ष केले.-  सिध्देश नाईक, अध्यक्ष, जि. पं. सदस्य.


 

Web Title: banastarim accident case mobs retreat after assurance of meghna sawardekar arrest march at mhardol police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.