स्किमिंगद्वारे एटीएममधून चोरलेली रक्कम ग्राहकाला परत देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:58 PM2018-11-24T17:58:20+5:302018-11-24T18:06:41+5:30
विदेशी चोरट्यांच्या एटीएम स्किमिंग प्रकरणाला बळी पडलेल्या वास्कोतील एका ग्राहकाला सदर बँकेने चोरीस गेलेली 70 हजाराची रक्कम सव्याज परतफेड करावी असा आदेश मडगावच्या दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.
मडगाव - विदेशी चोरट्यांच्या एटीएम स्किमिंग प्रकरणाला बळी पडलेल्या वास्कोतील एका ग्राहकाला सदर बँकेने चोरीस गेलेली 70 हजाराची रक्कम सव्याज परतफेड करावी असा आदेश मडगावच्या दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. तसेच सदर ग्राहकाला झालेल्या मनस्तापाबद्दल नुकसान भरपाई देण्याचाही आदेश दिला आहे.
पी. व्ही. सावईकर यांच्या अध्यक्षतेखालील मंचाने हा निर्णय दिला. वास्कोतील साऊथ इंडियन बँकेने सदर ग्राहकाला खात्यातून काढली गेलेली 70 हजारांची रक्कम काढलेल्या दिवसांपासून चार टक्के व्याजाने परतफेड करावी आणि त्याशिवाय दहा हजारांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला. 17 फेब्रुवारी 2018 रोजी दोघां विदेशी नागरिकांनी ही रक्कम पळवली होती.
वास्कोतील एका खलाशाचे साऊथ इंडियन बँकमध्ये खाते होते. त्याने आपल्या पत्नीला एटीएम कार्ड देऊन त्या कार्डची पीनही दिली होती. 6 फेब्रुवारीला तिने दाबोळी येथील या एटीएममधून दहा हजाराची रक्कम काढली होती. मात्र 17 फेब्रुवारी रोजी तिला या खात्यातून 70 हजार रुपये काढल्याची मॅसेज आला. पर्वरी येथील कॅनरा बँकच्या एटीएममधून ही रक्कम काढली गेली होती.
यासंदर्भात त्या महिलेने बँकेकडे तसेच वास्को पोलिसांकडे तक्रार दिली. बँकेने आपले 70 हजार रुपये परत करावेत असे त्या ग्राहकाने मे महिन्यात मागणी केल्यानंतर बँकेने ती नाकारताना तुमच्या स्वत:च्या चुकीमुळे रक्कम काढली गेली अशी भूमिका घेतल्याने त्या ग्राहकाने मंचासमोर आपला दावा दाखल केला. बँकेने मंचासमोर आपली बाजू मांडताना ग्राहकाने एटीएम कार्ड सुरक्षितपणे न हाताळल्यानेच त्रयस्थ व्यक्तीला त्या खात्यातून पैसे काढता आले अशी भूमिका घेतली.
मंचाने बँकेचा दावा फेटाळून लावताना सदर खात्यातून बनावटगिरी करुन पैसे काढल्याचे बँकेने नाकारलेले नसून नंतर विदेशी आरोपींनी एटीएमला स्किमर लावून हे पैसे पळविल्याचे स्पष्ट झाले आहे असे नमूद करुन या गोष्टीला ग्राहक स्वत: जबाबदार नाही. कुठल्याही ग्राहकाच्या खात्यातून अनधिकृतरित्या जर पैसे काढले गेले तर ती बँकेची जबाबदारी असून बँकेकडून सेवेत राहिलेली कमतरता या व्याख्येत ती मोडणारी आहे असे सांगून ही रक्कम फेडण्याची जबाबदारी बँक नाकारु शकत नाही असे नमूद केले. आपले कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी या ग्राहकाची जी धावपळ झाली आणि मनस्ताप झाला त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई देणे योग्य ठरेल असे या मंचाने आपल्या आदेशात म्हटले आहे.