गोव्यातील मुरगाव समुद्रात बार्ज बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:14 PM2019-04-30T15:14:35+5:302019-04-30T15:27:51+5:30

जपानहून आणलेल्या खजिन माल भरलेली ‘दत्ताराम १’ नावाची बार्ज सोमवारी (२९ एप्रिल) रात्री दक्षिण गोव्यातील मुरगाव समुद्रात बुडाली.

Barge drowned at mormugao goa | गोव्यातील मुरगाव समुद्रात बार्ज बुडाली

गोव्यातील मुरगाव समुद्रात बार्ज बुडाली

googlenewsNext
ठळक मुद्देजपानहून आणलेल्या खजिन माल भरलेली ‘दत्ताराम १’ नावाची बार्ज सोमवारी (२९ एप्रिल) रात्री दक्षिण गोव्यातील मुरगाव समुद्रात बुडाली.बार्जवर घटनेच्या वेळी ९ कर्मचारी असून सुदैवाने त्यांनी वेळीच बार्जच्या बाजूला असलेल्या ट्रान्सशिपर जहाजावर आश्रय घेतल्याने ते सुखरूप बचावले.‘दत्ताराम १’ ही बार्ज २२०० टन माल हाताळण्याची क्षमता ठेवत असून या बार्जमध्ये दुसऱ्या जहाजातून जपानहून आणलेला १६०० टन खजिनमाल भरण्यात आला होता.

वास्को - जपानहून आणलेल्या खजिन माल भरलेली ‘दत्ताराम १’ नावाची बार्ज सोमवारी (२९ एप्रिल) रात्री दक्षिण गोव्यातील मुरगाव समुद्रात बुडाली. या बार्जवर घटनेच्या वेळी ९ कर्मचारी असून सुदैवाने त्यांनी वेळीच बार्जच्या बाजूला असलेल्या ट्रान्सशिपर जहाजावर आश्रय घेतल्याने ते सुखरूप बचावले. ही बार्ज बुडण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी समुद्रात निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे ती बुडालेली असल्याचा अंदाज गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष विलियम डी’कॉस्ता यांनी व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दत्ताराम १’ ही बार्ज २२०० टन माल हाताळण्याची क्षमता ठेवत असून या बार्जमध्ये दुसऱ्या जहाजातून जपानहून आणलेला १६०० टन खजिनमाल भरण्यात आला होता. ही बार्ज मुरगाव बंदरापासून ६ ते ७ नॉटिकल मैल अंतरावर माल भरण्यासाठी नांगरून ठेवली असता सदर घटना घडल्याचे सूत्रांनी कळविले. उशिरा रात्री ‘मारिया लॉरा’ ट्रान्सशीपरवरून माल भरण्यात येत असताना अचानक या बार्जला जलसमाधी मिळाली. ही बार्ज बुडत असल्याचे याच्यावर असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी त्वरित या बार्जच्या जवळच असलेल्या ‘मारीया लॉरा’ ट्रांन्सशीपरवर आश्रय घेतल्याने त्यांचे प्राण सुखरूप रित्या बचावल्याची माहीती सूत्रांनी दिली. सदर घटनेबाबत अधिक माहीती घेण्यासाठी गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष विलीयम डी’कॉस्ता यांना मंगळवारी (३० एप्रिल) संपर्क केला असता उशिरा रात्री बुडालेली ती बार्ज मयुरेश आरोलकर यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

बार्ज बुडण्यामागचे नेमके कारण असून स्पष्ट झालेले नसले तरी समुद्रात झालेल्या खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात बार्जमध्ये पाणी शिरण्यास सुरू झाल्याने व नंतर या बार्जला भेग पडल्याने ती बुडालेली असल्याचा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येत असून योग्य तपासणीनंतरच कारण स्पष्ट होणार असे त्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी या बार्जमध्ये सुमारे १ हजार लीटर डीझल व काही प्रमाणात अन्य तेल (ऑइल) पदार्थ असल्याचे विलियम यांनी माहितीत सांगून समुद्रात ते पसरून प्रदुषण निर्माण न व्हावे यासाठी संबंधितांनी योग्य पावले उचललेली असल्याने याबाबतचा धोका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दहा वर्षापूर्वी (२००९ सालात) मुरगाव बंदरापासून थोड्या अंतरात असलेल्या समुद्रात अशाच प्रकारे खराब हवामानामुळे यापूर्वी अशाच प्रकारे अन्य एका बार्जला जलसमाधी मिळालेली होती अशी माहिती विलियम यांनी पुढे दिली. जलसमाधी मिळालेल्या या बार्जवरील सर्व कर्मचारी सुदैवाने पूर्णपणे सुखरूप असल्याचे विलियम यांनी माहितीत शेवटी सांगितले आहे. 


 

Web Title: Barge drowned at mormugao goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.