मासेमारी नौकांना बार्जची धडक, सुदैवाने जिवीतहानी नाही
By पंकज शेट्ये | Published: March 24, 2024 04:42 PM2024-03-24T16:42:07+5:302024-03-24T16:43:02+5:30
खारीवाडा, वास्को येथील मासेमारी व्यवसायातील बांधवांकडून मिळालेल्या माहीतीनुसार रविवारी सकाळी १० वाजता ती घटना घडली.
वास्को: रविवारी (दि.२४) सकाळी एम.व्ही बिचोली नामक सेसा गोवा कंपनीची बार्ज समुद्राच्या पाण्यातून वाहून जाऊन खारीवाडा मासेमारी जेटीवर समुद्रात नांगरून ठेवलेल्या पाच ते सहा मासेमारी नौकांना धडकली. नांगरून ठेवलेल्या लाकडी नौकांना बार्जची धडक बसल्याने त्यांची बरीच नुकसानी झाली आहे. सुदैवाने त्या घटनेत जिवीतहानी झाली नाही.
खारीवाडा, वास्को येथील मासेमारी व्यवसायातील बांधवांकडून मिळालेल्या माहीतीनुसार रविवारी सकाळी १० वाजता ती घटना घडली. खारीवाडा मासेमारी जेटीवर अनेक लाकडी मासेमारी नौका समुद्रात नांगरून ठेवलेल्या आहेत. एम.व्ही.बिचोली बार्ज खारीवाडा जेटीवर नांगरून ठेवलेल्या ५ ते ६ नौकांना जाऊन धडकली. तांत्रीक बिघाड, समुद्रात निर्माण झालेले खराब हवामान की अन्य कारणामुळे ती बार्ज समुद्रातून वाहून जाऊन नौकांना धडकली त्याबाबतची योग्य माहीती मिळाली नसल्याचे मासेमारी व्यवसायातील बांधवांनी सांगितले.
बार्जची धडक बसून ५ ते ६ नौकांची झालेल्या नुकसानीत सायमन परेरा नामक बांधवाच्या एका नौकेचा समावेश आहे. त्यांच्याशी चर्चा केली असता आपल्या लाकडी नौकेला बार्जच्या धडकेमुळे मोठी नुकसानी झाल्याचे त्यांनी सांगितले. मासेमारी व्यवसाय कमी झाल्याने, सरकार कडून अनुदान मिळत नसल्याने आणि अन्य कारणामुळे अनेक बांधवांनी मासेमारी नौका खारीवाडा जेटीवर नांगरून ठेवल्याची माहीती परेरा यांनी दिली. त्या नौका मासेमारीसाठी जात नसल्याने पूर्वीच आर्थिक नुकसानी सोसावी लागत असून आता त्या बार्जने धडक देऊन आमच्या नौकांना मोठी नुकसानी केली आहे.
संबंधित कंपनीने येऊन आमच्या नौकांना कीती नुकसानी झाले आहे त्याची तपासणी करून ती नुकसान भरपाई आम्हाला द्यावी अशी मागणी सायमन परेरा यांनी केली. रविवारी बार्जने नांगरून ठेवलेल्या नौकांना धडक दिलेल्या घटनेत सुदैवाने कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही.