एटीएम हॅकर्सपासून बचावासाठी अशी घ्या खबरदारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 07:58 PM2018-10-17T19:58:46+5:302018-10-17T19:59:02+5:30
एटीएम मशिनला स्कीमर बसवून कार्डवरची माहिती चोरून बँक ग्राहकांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार रोमानिया, बल्गेरिया आणि हंगेरी या तीन देशातील नागरिकांकडून गोव्यात झालेले असून आतापर्यंत अशा प्रकारच्या 12 गुन्ह्यांचा छडा गोवा पोलिसांनी लावला आहे.
मडगाव: एटीएम मशिनला स्कीमर बसवून कार्डवरची माहिती चोरून बँक ग्राहकांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार रोमानिया, बल्गेरिया आणि हंगेरी या तीन देशातील नागरिकांकडून गोव्यात झालेले असून आतापर्यंत अशा प्रकारच्या 12 गुन्ह्यांचा छडा गोवा पोलिसांनी लावला आहे. अशा प्रकारे माहिती चोरल्यानंतर क्लोन कार्डचा वापर करून ग्राहकांचे पैसे काढण्याची मोडस ऑपरेंडी या विदेशी आरोपींकडून वापरली जात असल्याचे लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी एटीएम वापरणा-यांना कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती समाज माध्यमांवर जारी केली आहे.
स्किमरचा वापर करून एटीएम कार्ड धारकांना गंडा घालण्याचे बहुतेक प्रकार पर्यटकांची गर्दी असलेल्या भागात होत असल्याने कळंगूटचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी यासंदर्भात ग्राहकांनी कुठली खबरदारी घ्यावी याची माहिती देणारा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. अशा प्रकारे गंडा घालणा-या संशयितांना पकडण्यास मदत केल्यास 5 हजार रुपयांचे आणि एटीएमला लावलेला स्कीमर शोधून काढणा-यांना एक हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांबरोबर पोलिसांनाही असे बक्षीस दिले जाणार, असे कळविण्यात आले आहे.
एटीएम कार्डाचा नंबर जेथे टाईप केला जातो त्या की पॅडच्या वर हे स्कीमर बसवून माहिती चोरली जात असल्याचे लक्षात आल्यामुळे एटीएमचा वापर करताना ग्राहकांनी की पॅडच्या वर आपला हात ठेवावा जेणेकरून टाईप केलेली माहिती या मशिनला लावलेल्या की होल कॅमे-यात चित्रीत होणार नाही. असे करण्याबरोबरच एटीएमला कुणी स्कीमर तर बसविला नाही ना याचीही पहाणी करावी, असे पोलिसांनी कळविले आहे.
याशिवाय एटीएम मशिन बसविणा-या बँकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. एटीएम मशिन ज्या ठिकाणी इन्स्टॉल केले आहे तेथे आत व बाहेर पुरेसा उजेड आहे, याची तजवीज करावी. आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. या कॅमे-यात आवाज मुद्रित होण्याचीही क्षमता असावी. एटीएम मशिनच्या बाहेर प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. एटीएम मशिनची ठरावीक कालावधीत तपासणी करावी तसेच या मशिनच्या ठिकाणी अलार्म सिस्टम बसवावी, अशीही सूचना केली आहे. असे एटीएम मशिन निर्जनस्थळी बसविण्यात येऊ नयेत, अशीही सूचना बँकांना केली आहे.