धार्मिक भावना दुखवाल तर खबरदार: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 09:39 AM2023-09-09T09:39:57+5:302023-09-09T09:40:32+5:30
ताळगाव येथील फादरच्या वादग्रस्त व्हिडिओने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आक्षेपार्ह व प्रक्षोभक विधाने करुन लोकांच्या भावना दुखावणाऱ्या कोणाचीही यापुढे गय केली जाणार नाही. भावना दुखावणारी व्यक्ती हिंदू असो की ख्रिस्ती संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्या धर्मावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकजण आपापल्या भावनेनुसार प्रार्थना करतो. यापुढे कोणीही वादग्रस्त विधाने करुन इतर धार्मियांच्या भावना दुखावल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.
ताळगाव येथील एका ख्रिस्ती धर्मगुरूने हिंदू देव-देवतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, त्यावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वी फादर बोलमॅक्स पेरेरा यांचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ वादग्रस्त ठरला होता. चर्चमध्ये 'शर्माव' देताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अनुद्गारांद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. बजरंग दलाने त्यांच्या अटकेसाठी वास्को पोलिस स्थानकावर धडक दिली होती. फादर बोलमॅक्स यांनी शेवटी माफी मागितली होती. आता ताळगावच्या धर्मगुरुंकडून अशीच हरकत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यांनी चर्चमध्ये संबोधित करताना हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होत आहे.
काय म्हणाले ताळगावचे फादर?
ताळगावच्या ख्रिस्ती धर्मगुरुचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्यांनी एक ख्रिस्ती युवती हिंदू युवकाच्या प्रेमात पडून मंदिरात जाऊन विवाह केल्याचा उल्लेख केला आहे. तिने हिंदू देवाला कसे स्वीकारले? खोट्या देवाची प्रार्थना कशी काय करता? असा प्रश्न करुन हे पाप आहे. अशाने शांती कशी मिळेल? डिप्रेशनमध्ये जाल. देवाशी खेळ करु नका, असे चर्चमध्ये 'शेर्मावि' देताना म्हटले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अशा लोकांना अटक करा
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल म्हणाले की, धार्मिक भावना दुखावणा- यांवर कडक कारवाईची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. इतर धर्मीयांच्या देव देवतांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांना अटक व्हायला हवी, मग तो धार्मिक नेता किंवा कोणीही असला तरी कारवाई व्हायला हवी.
गोव्यात सर्वधर्मसमभाव आहे. प्रत्येकजण एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. दुसऱ्याच्या धर्माबद्दल प्रक्षोभक विधाने करणे चुकीचे आहे, असे प्रकार घडल्यास सरकार कारवाई करणार आहे.