हिंदू धर्म रक्षणासाठी कटिबद्ध व्हा; जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे भक्तांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:12 PM2023-11-29T12:12:34+5:302023-11-29T12:13:19+5:30
त्रिपुरारी पौर्णिमेच्या वारी उत्सवाच्या गोवा पीठातील शिव मंदिरातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : 'हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध होऊया' असे आवाहन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केले. त्रिपुरारी पौर्णिमेच्या वारी उत्सवाच्या गोवा पीठातील शिव मंदिरातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले की, भारतीय संविधानातील कलम ३४० हे आदिवासींच्या संरक्षणासाठी निर्माण केलेले आहे. आदिवासींना आपल्या प्रथा, परंपरा, आपली संस्कृती, संस्कार हे जपले पाहिजे. यासाठी कायद्यात त्यांना संरक्षण दिलेले आहे. म्हणून ते आरक्षण आहे. परंतु ख्रिश्चन मिशनरी त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन तुम्ही वनवासी आहात, आदिवासी आहात, तुमचा आणि हिंदूचा संबंध नाही, अशा प्रकारे गैरसमज पसरवू लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की, ते आदिवासी देय जे लोक आपली उपासना बदलून अशा प्रकारे आचरण करतात,
त्यांच्या सवलती काढून घ्या.
उत्सवाला पद्मनाभ शिष्य संप्रदाय पीठाधीश, चैतन्य आश्रम बोरीचे परमपूज्य राधे स्वामी, आरएसएसचे संघ संचालक मोहन आमशेकर, विश्व हिंदू परिषदेचे सदस्य अनिल सामंत, गोवा मराठी अकादमी अध्यक्ष संतोष नाईक, पद्मनाभ सांप्रदायिक अध्यक्ष आणि विश्व हिंदू परिषद अध्यक्ष चंद्रकांत गवस व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गावस यांनी सांगितले की, जे कार्य नरेंद्राचार्यजी माऊलींनी सुरू केले आहे, तेच कार्य आम्ही करीत आहोत. सगळ्याच संप्रदायांना एकसंघ करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, नरेंद्राचार्यजी महाराजांचे कार्य मला ज्ञात आहे. स्वामींनी सनातन हिंदू धर्माची पताका उंचावण्याची जबाबदारी सोपविली आहे. ही हिंदू धर्माची पताका उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करू. यावेळी विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. युवांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, नूतन शिव मंदिराची पायाभरणी, दीपमाला प्रज्वलन करण्यात आले. गरीब व गरजूंना चारा कापण्याचे मशीन दिले. नरेंद्राचार्यजी माऊलींच्या हस्ते ब्रह्मानंद स्वामींच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. मरणोत्तर देहदानाचे अर्ज स्वामींच्या हस्ते वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.