‘बीच व्हिजिल ॲप’ आता लोकांसाठीही खुले, किनाऱ्यांवर गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई - रोहन खंवटे :
By किशोर कुबल | Published: December 5, 2023 12:46 PM2023-12-05T12:46:35+5:302023-12-05T12:46:59+5:30
Goa: गोव्याचे पर्यटन खाते लवकरच ‘बीच व्हिजिल ॲप’ लोकांसाठी खुले करणार असून या अॅपवर किनाय्रांवरील गैरप्रकार किंवा अस्वच्छता अथवा कायद्याचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.
- किशोर कुबल
पणजी : गोव्याचे पर्यटन खाते लवकरच ‘बीच व्हिजिल ॲप’ लोकांसाठी खुले करणार असून या अॅपवर किनाय्रांवरील गैरप्रकार किंवा अस्वच्छता अथवा कायद्याचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. पर्यटकांकडून घातला जाणारा धिंगाणा तसेच गैरवर्तन याबद्दल विचारले असता वरील माहिती देताना खंवटे म्हणाले कि, ‘यापुढे लोक अशा प्रकरणांमध्ये ॲपवर तक्रार करु शकतात. तात्काळ कारवाई केली जाईल.’
खंवटे म्हणाले की,‘ बीच व्हिजिल ॲप’ आतापर्यंत केवळ पर्यटन विभागाचे अधिकारी, शॅक व्यावसायिक, जीवरक्षक, पोलिस यांच्यापुरतेच मर्यादित होते. येत्या काही दिवसात आम्ही ते जनतेसाठी खुले करणार आहोत. आम्हाला स्वयंपोषक व जबाबदार पर्यटन हवे आहे. पर्यटकांचा कोणताही धिंगाणा खपवून घेतला जाणार नाही.’
खंवटे म्हणाले कि, ‘गोव्यात मौजमजा करण्यासाठी येणाय्रा पर्यटकांनी जबाबदारीने वागावे, अशी आमची अपेक्षा आहे. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतो. रात्री उशिरा काही घडले तर किनाय्रावर तैनात असलेले आयआरबी पोलिस मदतीला धावतात. १३६४ क्रमांकावर हेल्पलाइन २४ तास चालू असते.’