बाणावलीत सहा युवकांना मारहाण: संशयित विमानात बसला असता पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By सूरज.नाईकपवार | Published: October 8, 2023 05:43 PM2023-10-08T17:43:37+5:302023-10-08T17:43:59+5:30
याप्रकरणातील एक हल्लेखोर रविवारी दुपारी विमानाने लंडनमध्ये जाण्यासाठी मोपा विमानतळवर विमानात बसला होता.
लोकमत न्युज नेटवर्क
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा येथील बाणावली येथे सहा युवकांंना बेदम मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणातील एक हल्लेखोर रविवारी दुपारी विमानाने लंडनमध्ये जाण्यासाठी मोपा विमानतळवर विमानात बसला असताना, कोलवा पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
सॅम्युयल लियो मास्कारेन्स (२१, रा गिरदोली) असे त्याचे नाव आहे. त्याचे अन्य तीन सहकारी सदया फरार असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या हल्ल्यात ॲलोयसिस बार्रेटो हा करमणे येथील युवक गंभीर जखमी असून, त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. त्याचे अन्य मित्र आद्रेल डिकॉस्ता, नोविन कालड्रिया , मेबन फुर्तादो, गॅरी रॉड्रिगिस व गॉर्डन रॉड्रिगिस यांनाही मारहाण झाली आहे. सॅम्युयल याचे अन्य साथिदाराची नावे आकाश आटवेकर, सिध्देश व केशव अशी असून, सदया त्यांचा तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भादंसंच्या ३२३,३२४,५०६ कलमाखाली पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत.
मध्यरात्री दीडच्या सुमारास संशयित व जखमी युवकामंध्ये बाणावली येथे एका रेस्टॉरन्मध्ये पर्किगच्या जागेत वाद झाला. त्यावेळी शाब्दीक चकमक उडून बुक्यांनी मारहाण ही करण्यात आली. नंतर संशयितांनी त्या युवकांना खारेबांद येथे गाठले व पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी सळीचाही वापर करण्यात आला. यात ॲलयसिस हा गंभीर जखमी झाला आहे.
सॅम्युयल हा दहा दिवसांच्या सुटीवर लंडनमधून गोव्यात आला होता. रविवारी पुन्हा तो जाणार असल्याने त्याने आपल्या मित्रासमवेत पार्टी केली होती. मध्यरात्री मारहाणीची घटना घडल्यानंतर पोलिस आपल्या मागावर आहेत याची त्याला किचिंतही कल्पना नव्हती. तो मोपा विमानतळावर लंडनला जाणाऱ्या विमानातही बसला होता. पोलिसांनी विमानतळावर जाउन इमिग्रेशन विभागाकडे त्याच्यासंबधी विचारणा केली असत, तो विमानात बसल्याचे पोलिसांनी कळाले. लागलीच पोलिसांनी विमानात जाउन त्याच्या मुसक्या आवळल्या.