प्रगतशील शेतकरी बना, उत्पन्न होईल दुप्पट: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 11:48 AM2024-05-18T11:48:00+5:302024-05-18T11:48:36+5:30
पणजीत आंबा महोत्सव सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्वयंपूर्ण गोवाअंतर्गत कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध योजना आखल्या जातात. कृषी क्षेत्रासंबंधी आधुनिक यंत्रणा काळानुसार विकसित झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून प्रगतशील शेती पद्धती आत्मसात करण्यावर भर द्यावा, यातून उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
कला अकादमी येथे कृषी खात्यातर्फे दोन दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. त्यांच्यासोबत कृषिमंत्री रवी नाईक, कृषी खात्याचे संचालक नेवील अफान्सो, उपसंचालक संदीप फळदेसाई व आयसीआरचे संचालक डॉ. प्रवीण कुमार उपस्थित होते. दि. १९ पर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे.
महोत्सवाच्या उद्घाटननंतर मुख्यमंत्री म्हणाले की, मानकुराद आंबा सर्वांनाच माहीत आहे. राज्यात पिकणाऱ्या या आंब्याला मोठी मागणी आहे. या आंब्यासह आंब्याच्या इतर प्रजाती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी आंबा महोत्सव एक दर्जेदार व्यासपीठ ठरणार आहे. आंब्यांसोबत काजू नारळ, भाजी, हळद वरही शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. कृषी क्षेत्रासाठी राज्यातील वातावरण सर्वोत्तम आहे. सरकार शेतकऱ्यांना आयसीआरअंतर्गत प्रशिक्षण किंवा इतर यंत्रणांची मदतही करत असते, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
देशात पहिल्यांदाच कृषी कार्ड आणण्यात आले. सॉइल कार्ड अंतर्गत मातीची तपासणी केली जाते. त्या मातीत कोणत्या पिकाची लागवड होऊ शकते, हेही अधिकारी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. शेतकरी शेती करूनच चांगले जीवन जगू शकतात, असे डॉ. सावंत यांनी यावेळी अधिक माहिती देताना सांगितले.
आंबे निर्यात करण्याचा प्रयत्न : कृषिमंत्री
राज्यातून आंबे निर्यात व्हावेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पण ते शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी जर आंबा उत्पादनावर अधिक लक्ष दिले, मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींच्या आंब्यांची लागवड केली, तर येणाऱ्या काळात निश्चितच आंबे निर्यात करता येईल, असे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
महोत्सवाची वैशिष्ट्ये
आंब्यांच्या ७५ पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश. १,००० पेक्षा जास्त आंबा उत्पादकांचा सहभाग. स्थानिक लागवडीला चालना व लोकांसाठी विविध प्रकारचे आंबे उपलब्ध. महोत्सव दरम्यान शेतकऱ्यांना मिळणार खास प्रशिक्षण. विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन. आंब्यांपासून बनलेले विविध खाद्यपदार्थ, शीतपेय उपलब्ध