कुक्कुटपालन व्यवसायातून स्वयंपूर्ण बना: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2024 01:22 PM2024-10-06T13:22:48+5:302024-10-06T13:24:16+5:30
चिकन, अंड्यांना राज्यात मोठी मागणी; युवकांनी पुढे येण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात मोठ्या प्रमाणात चिकन व अंड्यांना मागणी आहे. कुक्कुटपालन व्यवसायात गोव्यातील लोक कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रतिदिन कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय अन्य राज्यातील लोकांना द्यावा लागत आहे. गोव्यातील तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा कुक्कुटपालन व्यवसाय करावा. गोव्यातील किमान ४०० ते ५०० युवक या व्यवसायासाठी पुढे आले तर गोव्यातील चिकन व अंड्यांसाठी अन्य राज्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी मदत होईल. या व्यवसायात युवकांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कुक्कुटपालन क्षेत्रात नवीन उद्योजक तयार व्हावेत, यासाठी अखिल गोवा पोल्ट्री फार्म अँड ट्रेडर्सेशन व पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक आणि औषध संचालनालयाचे संचालिका श्वेता देसाई, अखिल गोवा पोल्ट्री फार्म व ट्रेडर असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक, सचिन दामोदर बावचीकर, खजिनदार दीपक देसाई, जनार्दन नाईक, श्रद्धा नाईक, वि. के. मनोहर ओन्ली बरेंटो, प्रिस्को सिक्वेरा, कन्हैया लाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जयकृष्णा नाईक यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसायाबरोबरच अन्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात अंडी व चिकनसाठी मागणी आहे. या व्यवसायामध्ये युवक मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात. मागील काही वर्षांपूर्वी गोव्यात कुक्कुटपालन व्यवसायात सुमारे ४०० पेक्षा जास्त शेतकरी होते. मात्र सध्या २० ते २५ शेतकरी शिल्लक आहेत. विविध कारणांमुळे कुक्कुटपालन व्यवसायात शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. सध्या सरकारच्या सहकार्याने या व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यास वाव आहे. त्यासाठी युवकांनी आधुनिक पद्धतीने व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे.
सरकार पाठिंबा देणार...
हा व्यवसाय करण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. एकदा व्यवसाय बसला की सुरळीतपणे सुरू राहतो. हा व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी असोसिएशनने कोंबड्यांसाठी लागत असलेले खाद्य स्वतः आणावे, तसेच चिकनचे रेट तसेच अन्य गोष्टींकडे लक्ष द्यावे. सरकार या व्यवसायासाठी जी काही मदत लागेल. त्याला नेहमीच पाठिंबा देणार, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.