अनर्थ टळला! उड्डाण घेण्यापूर्वी इंजिनातून धूर आल्यानं पायलटनं विमान केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 10:51 PM2022-08-23T22:51:26+5:302022-08-23T22:51:48+5:30
१८७ प्रवाशांना घेऊन मुंबईला जाण्यासाठी रवाना होणार असलेले विमान थांबवण्यात आले
वास्को: मंगळवारी दुपारी दाबोळी विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेण्याकरिता १८७ प्रवाशांना घेऊन ‘इंडिगो एअरलाईन्स’ चे विमान ‘पेरलर टॅक्सी बे’ वरून धावपट्टीवर येण्याकरिता वैमानिकाने विमान चालू केले असता विमानाच्या उजव्या इंजिनात स्पार्क होऊन धूर येण्याची घटना घडली.
मुंबईला जाण्यासाठी उड्डाणाची तयारी करित असतानाच विमानाच्या उजव्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाला समजताच त्यांनी अनर्थ टाळण्यासाठी त्वरित विमान बंद केले. ही घटना घडली तेंव्हा मुंबईला जाण्यासाठी त्या विमानात १८७ प्रवासी असून त्यात चार चिमुकल्यांचा समावेश होता. वेळेतच वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजल्याने त्यांनी विमान बंद केल्याने सुदैवाने येथे होणारा अनर्थ टळला.
दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी १.२६ वाजता ही घटना घडली. इंडीगो एअरलाईन्सच्या ‘६इ ६०९७’ विमानात १८७ प्रवाशी बसल्यानंतर त्या विमानाने मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेण्याच्या तयारीला सुरवात केली. वैमानिकाने मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेण्याकरिता विमान ‘पेरलर टॅक्सी बे’ वरून धावपट्टीवर आणण्यासाठी विमान चालू केले असता अचानक विमानाच्या उजव्या इंजिनात ‘स्पार्क’ (आगीची कीट्टी पेटली) होऊन इंजिनातून धूर आला. विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाला समजताच त्यांनी त्वरित विमान बंद केले. मुंबईला रवाना होणार असलेल्या त्या विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे नौदलाच्या बचाव पथकाला समजताच त्यांनी त्वरित विमान उभे असलेल्या ठिकाणी धाव घेतली. तसेच त्या विमानात असलेल्या प्रवाशी आणि विमानाला धोका नसल्याची खात्री त्यांनी करून घेतली. त्यानंतर ते विमान ‘बे ९’ वर नेऊन नंतर विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले.
सुदैवाने याघटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाला वेळेतच समजल्याने मोठा अनर्थ टळला. ‘इंडीगो एअरलाइन्स’ च्या त्या विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्या विमानातून मुंबईला जाणार असलेल्या १८७ प्रवाशांना नंतर दुसºया विमानातून मुंबईला पाठवण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. तांत्रिक बिघाड निर्माण झालेले ते विमान विमानतळाच्या ‘बे ९’ वर उभे केले असून त्या विमानाच्या कंपनीचे संबंधित तांत्रिक येऊन विमानाची दुरूस्ती केल्यानंतर ते येथून रवाना होणार असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांच्याकडून प्राप्त झाली.