बीफ विक्री बंदीमुळे 1 कोटी 25 लाखांचा व्यवहार ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 05:50 PM2018-01-07T17:50:54+5:302018-01-07T17:51:06+5:30
मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे शनिवारी आणि रविवार अशा दोन दिवसांत प्रति दिनी 62 लाख 50 हजार रुपयांप्रमाणो 1 कोटी 25 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.
पणजी : बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून होणा-या तपासणीमुळे कंटाळून येथील कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे शनिवारी आणि रविवार अशा दोन दिवसांत प्रति दिनी 62 लाख 50 हजार रुपयांप्रमाणो 1 कोटी 25 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि नाताळाच्या तोंडावर पाटो-पणजी येथे बोलेरो गाडीला अपघात झाल्यामुळे सुमारे दीड हजार किलो बेकायदा बीफ हॉनोररी अॅनिमल वेल्फेअर संस्थेच्या अधिका-यांनी पकडून त्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांतच वेर्णा येथे पशुसंवर्धन मंडळाच्या अधिका-यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सुमारे दीडशे किलो बीफ आणि दोघांना साहित्यासह ताब्यात घेतले होते. त्यामुळे पाच दिवस मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. मात्र पुन्हा दोन दिवसांपूर्वी होंडा येथे कर्नाटकातून बीफ घेऊन येणारी बिगरसरकारी संस्थेने पकडली. त्यातही काही लाख रुपयांचे बीफ सापडले होते. यावरून बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून होणा-या या वारंवारच्या तपासणीमुळे मांस विक्रेते चांगलेच त्रसले. त्यामुळे शनिवारपासून कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने संप पुकारला.
या पुकारलेल्या संपामुळे रविवारीही दुकाने बंद राहिल्याने बीफ खरेदी करणा-यांवर चांगलाच परिणाम झाला. अनेकांनी दुकाने बंद असल्याचे पाहून चिकन आणि मासळी खरेदीला पसंती दिली. राज्यात दर दिवशी 25 टन बीफ विकले जात असून, विक्रेत्यांकडे 15 टन आणि केटरटर्स, हॉटेल व मॉलवाले यांना 10 टन बीफ लागते.
250 रुपये किलोप्रमाणे विकले जाणा-या बीफचा मांसाची आवक बंद झाल्यामुळे 62 लाख 50 हजार रुपयांचा रोजचा व्यवहार होत होता. दोन दिवसांमुळे 1 कोटी 25 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला असून, सोमवारी मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतर बैठक होईल. मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतरच या विक्रीविषयी काहीतरी निर्णय होऊ शकतो. अन्यथा तिस-या दिवशी दुकाने बंद राहिल्यास एकूण तीन दिवसांत बीफ विक्रीचा 1 कोटी 87 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प होणार आहे.
कॅटरर्सवरही परिणाम
बीफ बंदीमुळे कटलेट्स तयार करणारे छोटे दुकानदार, त्याचबरोबर पार्टीची ऑर्डर घेणारे कॅटर्स यांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. नाताळानंतर कॅटर्स यांचा चांगला व्यवसाय चालतो. कारण कोणाचे लग्न, त्याचबरोबर कोणाच्या वाढदिवस पार्टी, लग्नाची पार्टी वगैरे असतात. त्यांत त्यांना बीफपासून काही पदार्थ बनविणो अपेक्षित असते, बीफच नसल्यामुळे त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी आशा त्यांना लागून आहे.
आज बैठक शक्य
शनिवारी झालेल्या बैठकीत संघटनेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांनंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सोमवारी पर्रीकर उपलब्ध असल्यास संघटनेची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीची निश्चित वेळ समजली नसल्याने ती सायंकाळी होईल, असे संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.