लमाणी व्यावसायिकांवरुन बाणावलीत ‘भायले-भितरले’ वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 05:55 PM2018-12-19T17:55:53+5:302018-12-19T18:02:04+5:30
गोव्यातील किनारपट्टी भागात वारंवार धुमसत असलेल्या ‘गोमंतकीय विरुद्ध बिगर गोमंतकीय’ या वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून मडगावपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या बाणावली समुद्र किनाऱ्यावर सध्या लमाणी जमातीच्या व्यावसायिकांविरोधात स्थानिकांनी सवतासुभा उभा केला आहे.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्यातील किनारपट्टी भागात वारंवार धुमसत असलेल्या ‘गोमंतकीय विरुद्ध बिगर गोमंतकीय’ या वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून मडगावपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या बाणावली समुद्र किनाऱ्यावर सध्या लमाणी जमातीच्या व्यावसायिकांविरोधात स्थानिकांनी सवतासुभा उभा केला आहे. यामुळे लमाणी व्यापाऱ्यांची सर्व दुकाने स्थानिकांनी बंद पाडली आहेत. दुसऱ्या बाजूने आम्ही लमाणी म्हणून आम्हाला व्यवसाय करण्याचा हक्क नाही का असा प्रश्न उद्भवून या व्यापाऱ्यांनीही न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
वासप्पा मलगीमणी उर्फ वासू या टॅक्सी ड्रायव्हरने स्वत: टॅक्सीचे परमीट काढून आपली गाडी बाणावलीतील एका हॉटेलात कामाला लावण्याच्या घटनेमुळे हा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक टॅक्सी चालकांनी आमच्या व्यवसायात आम्ही बिगर गोमंतकीयांना आत शिरू देणार नाहीत असा दावा करुन जोपर्यत लमाणी टॅक्सी व्यावसायिक या व्यवसायातून बाहेर जात नाहीत तोपर्यत बाणावलीच्या किनारपट्टीवर इतर लमाण्यानाही व्यवसाय करु देणार नाही असे सांगून दोन दिवसांपूर्वी ही सर्व दुकाने बंद केली होती. त्यामुळे या भागात वाद उद्भवला होता.
मंगळवारी (19 डिसेंबर) याच पार्श्वभूमीवर रोजी बाणावलीत झालेल्या खास ग्रामसभेत स्थानिकांनी संपूर्ण लमाणी व्यावसायिकांवर निर्बंध आणावेत आणि किनारपट्टीवरील त्यांची दुकाने बंद पाडावीत असा ठराव घेतला. गोमंतकीयांच्या सर्व व्यवसायावर आता बाहेरच्या लोकांचे अतिक्रमण होत असून गोवेकरांच्या पारंपारिक टॅक्सी व्यवसायावरही आता बिगर गोमंतकीय कब्जा करु पहातात असा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, या वादात गोवा बंजारा समाजाने लक्ष घातले असून केवळ आम्ही लमाणी म्हणून आम्हाला गोव्यात व्यवसाय करता येत नाही का असा सवाल या समाजाचे अध्यक्ष गणोश लमाणी यांनी केला आहे. ज्या टॅक्सी चालकाविरोधात स्थानिकांनी आवाज उठविलेला आहे तो मागची 25 वर्षे बाणावली गावात रहातो. मागची 25 वर्षे तो या भागात टॅक्सी चालवित आहे. आता त्याने स्वत:च्या मालकीची टॅक्सी घेतल्यावरच स्थानिकांना तो बिगर गोमंतकीय वाटू लागला का असा सवाल त्यांनी केला आहे. ज्या टॅक्सी ड्रायव्हरच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उठविला आहे त्याला स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव यांनीच ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ जारी केली आहे असेही लमाणी यांनी सांगितले. गोव्यात व्यवसाय करणारे लमाणी व्यावसायिक कायदेशीररित्या आपला व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना अडविण्याचा अधिकार कुणालाही नाही. स्थानिकांची ही अडवणूक चालूच राहिल्यास त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा लमाणी यांनी दिला आहे.