सावधान, डेंग्यूचा कहरच; नऊ महिन्यांत २६२ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:39 PM2023-09-27T12:39:42+5:302023-09-27T12:40:55+5:30

लोकांच्या मनात मात्र संशय आहेच. 

beware dengue ravages in goa 262 patients in nine months | सावधान, डेंग्यूचा कहरच; नऊ महिन्यांत २६२ रुग्ण

सावधान, डेंग्यूचा कहरच; नऊ महिन्यांत २६२ रुग्ण

googlenewsNext

कोविड संकटाने गोमंतकीयांना दोन वर्षे पूर्ण जेरीस आणले. गेल्या सहा महिन्यांपासून लोक मोकळा श्वास घेत आहेत. तरीदेखील थंडीतापाची साथ वारंवार ग्रासतेय. कोविड होऊन गेल्यानंतर हृदयविकाराशी संबंधीत तक्रारीही वाढल्या आहेत. अर्थात कोविडमुळे आता हृदयविकार होतो किंवा हृदयविकाराचे झटके येतात, असे म्हणण्यास वाव नाही. तसे शास्त्रीयदृष्ट्या सिद्धही झालेले नाही. मध्यंतरी एकदा लोकमत कार्यालयात गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम झाला. त्यांनीही तक्रारी वाढल्याचे सांगितले होते; पण कोविडचा संबंध आताच्या हृदयविकार तक्रारीशी आहे, असे म्हणता येत नाही हेही स्पष्ट केले. लोकांच्या मनात मात्र संशय आहेच. 

गोव्यात आता सहसा मलेरियाचे रुग्ण आढळत नाहीत. मात्र, आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. डेंग्यू अधिक घातक आहे. तिसवाडीतील एका राजकीय नेत्यालाही काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. गेले आठ महिने डेंग्यूचे रुग्ण अनेक ठिकाणी आढळून येत आहेत. फक्त कोविडसारखा त्याचा गवगवा झाला नव्हता. कोविडवेळी प्रत्येकाच्या तोंडाला मास्क बांधलेले असायचे. त्यामुळे कोविडविषयी जागृती व भीतीही अधिक वेगाने पसरली होती. डेंग्यूने गोमंतकीयांना पूर्ण गाफील ठेवून मग विळखा घातला आहे. गोव्यात डेंग्यूमुळे सोळा संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी बातमी पूर्वी सहसा ऐकायला मिळत नव्हती. एक-दोन किंवा तीन-चार बळी जायचे. मात्र, गेल्या नऊ महिन्यांत सोळा जणांचा जीव डेंग्यूने घेतला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी परवा मीडियाला दिलेली माहिती ही कुणाचेही डोळे विस्फारणारी ठरली आहे. दर महिन्याला सरासरी दोन मृत्यू डेंग्यूमुळे झाले, असा अर्थ होत आहे. 

नऊ महिन्यांत २६२ डेंग्यू रुग्ण आढळले. वास्तविक ही संख्या याहून अधिक असू शकते. ग्रामीण भागात अनेक लोक ताप अंगावर काढतात. एकदम गंभीर अवस्था झाल्याशिवाय लोक डॉक्टरकडे जातदेखील नाहीत. बार्देश तालुक्यात एका नवविवाहित मातेचा अलीकडेच डेंग्यूने जीव घेतला. दोन महिन्यांच्या बाळाची माता एरव्ही निरोगी व धडधाकट होती. मात्र, डेंग्यू झाला आणि तिचे प्राण गेले. हे सगळे धक्कादायक आहे. यामुळे जास्त काळजी घेण्याची गरज आहे. दरवेळी आरोग्य खात्याची यंत्रणा लोकांच्या मदतीला पोहोचणार नाही. आपण आपली काळजी घेणे केव्हाही चांगले. पाणी साठून राहणार नाही याची खबरदारी घ्यावीच लागेल. घरांच्या आजूबाजूला पडलेल्या करवंट्या किंवा निरुपयोगी भांडी, फुलझाडांच्या कुंड्या आदी ठिकाणी डासांची पैदास होते. 

वास्तविक आरोग्य खात्याने पूर्वीच डेंग्यूविरोधी मोहीम राबवायला हवी होती. लोकांमध्ये अधिक जागृती करायला हवी होती. गणेशोत्सवापूर्वी गोव्यात डेंग्यूचे जास्त रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त म्हणजे ८० डेंग्यू रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणेने आतादेखील अधिक वेगाने उपाययोजना करावी. अनेक ठिकाणी पालिका व पंचायत सदस्यांना स्वच्छतेशी काही घेणे-देणे नसते. वैद्यकीय अधिकारीदेखील सुस्त असतात. नगरसेवक, पंच सदस्य, पालिकांचे मुख्याधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचा वापर मंत्री विश्वजित राणे यांनी करावा व डेंग्यूविरुद्ध लढाई सुरू करावी. काही ठिकाणी सरकारी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार करणे टाळले जाते, सरकारी डॉक्टरांकडून खासगी इस्पितळात चला, असा सल्ला रुग्णांना दिला जातो. यात तथ्य आहे का, याचा शोध मंत्री राणे यांनी घ्यावा. सोमवारी राणे यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली हे चांगले केले.

किनारी भागात बांधकाम व्यवसाय जोरात आहे. मजुरांकडे आरोग्य कार्डे आहेत का, हे तपासून पाहावे लागेल. उगाच कंत्राटदारांची सतावणूक नको; पण मजुरांकडे आरोग्य कार्डे असावीत. सासष्टी, मुरगाव, बार्देश, तिसवाडी या चार तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण अधिकच आढळतील. आरोग्य खात्याकडील नोंददेखील सांगते की, कांदोळी, कळंगुट तसेच मेरी - चिंबल- सांताक्रूझपट्ट्यात डेंग्यूचे रुग्ण तुलनेने अधिक आढळले आहेत. आरोग्य यंत्रणेने तिथे कोणती विशेष उपाययोजना हाती घेतली, ते सांगावे. कळंगुटमध्ये १०१ तर हळदोणे भागात डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले असून आता जनतेला सतर्क व्हावेच लागेल.
 

Web Title: beware dengue ravages in goa 262 patients in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.