भोमवासीयांना भेटन वस्तुस्थिती सांगावी: विजय सरदेसाई; स्थानिकांच्या लढ्याला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 09:09 AM2023-09-07T09:09:07+5:302023-09-07T09:10:17+5:30
भोमच्या नागरिकांनी भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भोम येथील महामार्गाच्या कामाविषयी मुख्यमंत्री, मंत्री तेथील लोकांची भेट घेऊन वस्तुस्थिती का सांगत नाही? स्वतःची घरे वाचवण्यासाठी तेथील लोकांना रस्त्यावर उतरावे लागणे, हे दुर्दैवी असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
भोमच्या नागरिकांनी आपली भेट घेतली. सदर विषयी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन भोमवासीयांना दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार सरदेसाई म्हणाले, की भोम येथील महामार्गाच्या कामामुळे तेथील केवळ चारच घरे जाणार, मंदिराला कुठलाही धोका पोचणार नाही, असे सरकार जरी सांगत असले, तरी तेथील लोकांना वाटणारी भीती चुकीची नाही. कारण शेवटी प्रश्न हा त्यांच्या घरांचा व मंदिरांचा आहे. जर सरकार काहीच चुकीचे करीत नाही तर मग ते रस्त्याचे पुन्हा संरेखन का करीत नाही? भोमवासीय आंदोलन करीत असतानाही मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याचे मंत्री तेथे जाऊन लोकांची भेट का घेत नाही? त्यांना वस्तुस्थिती का सांगत नाहीत? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
राज्यात गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने पोर्तुगीज राजवटीतील कायद्यांच्या धर्तीवर कठोर कायदे लागू करावेत. मद्यपान करून वाहन चालवण्यास कायद्याने बंदी असली तरी लोक वाहने चालवत आहेत. त्यासाठी पोलिसांनी वाहनचालकांची तपासणी गांभीर्याने करायला हवी, असेही ते म्हणाले.
... तर प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात
एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेमुळे प्रादेशिक राजकीय पक्षांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे. सदर संकल्पना लागू झाली तर लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. खरे तर हे निर्णय घेताना सर्व पक्षांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. देशाचे नाव इंडियावरुन भारत केले जाईल, अशी चर्चा आहे. यामुळे उलट आंतरराष्ट्रीय पातळीवर हसूच होईल. एका बाजूने चंद्रयान सारखी मोहीम आखत असताना दुसरीकडे देशाचे नाव बदलले जात असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.