भर वस्तीतून राष्ट्रीय महामार्गावरील काम करण्यास भोम ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 04:38 PM2023-03-30T16:38:37+5:302023-03-30T16:38:55+5:30
सरपंचाच्या कृतीचा केला निषेध, भोमची वाहतूक कोंडी सोडवायची असल्यास बायपास हा पर्याय आहे. जो सरकारला आम्ही वेळोवेळी सुचवला आहे.
अजय बुवा
फोंडा - वाहतुकीची कोंडी होते म्हणून सरकारने भोम येथून नव्या रस्त्याची व उड्डाणपूल चे सोपस्कार करण्यासाठी हालचाली केल्या होत्या परंतु सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविला आहे. गुरुवारी या संदर्भात सरपंचांनी पुढील सोपस्कार केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांच्या सदर कृतीचा निषेध केला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नवीन रस्त्या संबधीत जे काही आराखडे समोर येत आहेत ते दिशाभूल करणारे आहेत. मुळात आराखडा 2014 चा असताना जमीन अधिसूचित करण्याची प्रक्रिया मात्र आठ वर्षानंतर होत आहे.सदर प्रकरण हे गोंधळात टाकणारे आहे .लोकांनी सातत्याने या संदर्भात विरोध केला आहे व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. तरीसुद्धा लोकांनी नाकारलेले आराखडे घेऊन प्रशासन पुढे येत आहे. ते आम्ही कदापी मान्य करणार नाही. सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी यासंदर्भात व्यवस्थित अभ्यास करायला हवा होता. परिणामी आमच्था लोकांची नाराजी त्यांनी सुध्दा ओढवून घेतलेली आहे.
भोमची वाहतूक कोंडी सोडवायची असल्यास बायपास हा पर्याय आहे. जो सरकारला आम्ही वेळोवेळी सुचवला आहे. यावेळी एक गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार एका बांधकाम व्यवसायिकाने येथे प्लॉट्स निर्माण केले आहेत. सदर प्लॉट्स च्या ठिकाणी जाण्यास रस्ता नाही. सदरचे प्लॉट्स हे बेकायदेशीर आहेत .त्या प्लॉटच्या ठिकाणी जाण्याकरता रस्ता नाही तेव्हा भर वस्तीतील लोकांना तिथून हाकलून लावून नवीन रस्त्याच्या नावाखाली त्या बांधकाम व्यावसायिकाचे हित जपण्यासाठी सरकार काम करत आहे. ह्या संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार असून कशाही परिस्थितीत हा रस्ता भर वस्तीतून करू दिला जाणार नाही.