जुने गोवा येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
By समीर नाईक | Published: March 11, 2024 04:30 PM2024-03-11T16:30:49+5:302024-03-11T16:31:00+5:30
जुन्या गोव्यातील सुशोभिकरणाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले.
पणजी : जुने गोवा येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा गोव्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महाविद्यालयात १५३ हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत त्यांना या इमारतीचा लाभ होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
जुने गोव्यातील इला फार्म येथे गोवा कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन दरम्यान प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. सोबत कृषी मंत्री रवी नाईक, आमदार तथा गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, जुने गोव्याच्या सरपंच मेधा पर्वतकर, कृषी खात्याचे सचिव अरुणकुमार मिश्रा उपस्थित होते.
पडीक असलेल्या ६५ लाख चौरस मीटर क्षेत्रात शेती करू शकणाऱ्या ६५ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तीन कोटी रुपयांच्या कृषी सेतूचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत असून, त्याचा त्यांना फायदा झाला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
या इमारतीचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होणार असून, राज्याबाहेरील अनेक विद्यार्थीही येतील आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा गोवेकरांना होणार आहे. गोव्यात पूर्वी कृषी महाविद्यालय नव्हते. आमचे गोव्याचे लोक शिक्षणासाठी राज्याबाहेर आणि परदेशात जात असत. आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच कृषीमंत्री रवी नाईक कृषी क्षेत्रासाठी चांगले काम करीत आहेत, असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. जुन्या गोव्यातील सुशोभिकरणाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले असून, त्यासाठी १७ कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे, असेही फळदेसाई यांनी पुढे सांगितले.