आई-बाबांचा एकुलता एक लाडका गेला; गावात हळहळ
By आप्पा बुवा | Published: October 25, 2023 06:31 PM2023-10-25T18:31:28+5:302023-10-25T18:32:28+5:30
सदरचे वृत्त समजतात पिसगळ गावावर शोककळा पसरली.
फोंडा: गुरुवारी रात्री अपघातात जखमी झालेल्या भूषण सूर्यकांत गावडे(वय 22) यांचे मंगळवारी रात्री उशिरा गोवा मेडिकल कॉलेजमध्ये निधन झाले असून, आई बाबाचा एकुलता एक पुत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तानुसार पिसगळ प्रियोळ येथील भूषण सूर्यकांत गावडे हा गुरुवारी आपली दुचाकी (क्रमांक जीए -०५- सी - ९०९२) घेऊन घरी जात असताना,कोने येथे रस्त्याकडेच्या झाडावर त्याची जोरदार धडक बसली होती. सदर अपघातात त्याच्या डोक्याला मार बसला होता. मागचे सहा दिवस त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू होते. मंगळवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली. सदरचे वृत्त समजतात पिसगळ गावावर शोककळा पसरली.
एकुलता एक
भूषण गावडे हा आई-बाबांचा एकुलता एक होता. त्याचे वडील सूर्यकांत गावडे हे वीज खात्यात कामाला आहेत. तर आई गृहिणी आहे. भूषण ने काही दिवस काम केल्यानंतर पुन्हा एकदा तांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी त्याने आयटीआय मध्ये प्रवेश घेतला होता. आयटीआय पूर्ण करून एक चांगली नोकरी मिळवण्याचे स्वप्न तो व त्याचे कुटुंबीय पहात होते. परंतु त्यांच्या स्वप्नावर काळाने घाला घातला. बुधवारी दुपारी भूषण याचे पार्थिव पिसगळ गावात पोहोचताच लोकांनी पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला अंतिम निरोप दिला. चारच्या दरम्यान त्याच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.