गोवा, बिहारात खूप फरक; पण बिहारी माणूस फार जिद्दी व बुद्धिमान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 11:55 AM2023-06-11T11:55:33+5:302023-06-11T11:56:36+5:30
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी 'लोकमत' कार्यालयात जागविल्या आठवणी.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः गोवा व बिहारमध्ये खूप फरक आहे. परंतु, बिहारी लोक फार जिद्दी तसेच बुद्धिमानही आहेत म्हणून स्पर्धा परीक्षांमध्येही चमकतात, असे प्रतिपादन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
आर्लेकर यांनी काल 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी वरील आठवणी जागविल्या. ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशसारख्या थंड आणि शांत प्रदेशातून बिहारला उष्ण आणि अशांत प्रदेशात जाताना खूप गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या. बिहारात शिक्षणाच्या बाबतीत अनेक सुधारणा होणे आवश्यक आहे. कुलपती या नात्याने मी आतापर्यंत तेथील चार विद्यापीठांना भेटी दिल्या. पदवीदान समारंभांमध्येही भाग घेण्याची संधी सोडत नाही.
बिहारात इयत्ता बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी कोणीच थांबत नाहीत. पुढील शिक्षण बाहेर जाऊन इतर राज्यांमध्ये घेतात. ही परिस्थिती बदलायला हवी. बिहारमध्ये १७ विद्यापीठे आहेत. परंतु उच्च शिक्षणाच्या बाबतीत तेथे अनेक वर्षांपासूनच्या अडचणी आहेत. कुलपती या नात्याने मी या अडचणी माझ्या परीने सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.
आर्लेकर यांचा दीनक्रम सकाळी १० वाजता सुरू होतो. आधी ते विद्यापीठांचे कामकाज हाताळतात व नंतर गाठीभेटी सुरू होतात. बिहारचे मुख्यमंत्री, मंत्री सर्वांशी आपले चांगले संबंध आहेत. मी सरकारच्या कामात हस्तक्षेप करायला आलेलो नाही, असे आधीच स्पष्ट केलेले आहे. आर्लेकर म्हणाले की, बिहार राजभवनात १९० कर्मचारी माझ्या दिमतीला आहेत. तेथे मोठी बाग आहे ज्यात ३० ते ३५ प्रकारांचे आंबे आहेत. भागलपूरचा आंबा हा तेथे प्रसिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
परिस्थिती बदलणार
बिहार हा एकेकाळी शिक्षणाच्यादृष्टीने पुढारलेला प्रदेश! आर्य चाणक्य याच भूमीतील, परंतु आज तेथे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. ही परिस्थिती मला बदलायची आहे म्हणून विद्यापीठांच्या सिनेटच्या बैठकांमध्येही मी भाग घेत असतो. आतापर्यंत एकाही राज्यपालाने सिनेट बैठकांमध्ये भाग घेतला नव्हता. या माझ्या कामगिरीमुळे बिहार विधान परिषदेतही माझ्या अभिनंदनाचा ठराव संमत केलेला आहे.'
मासळीची आठवण येते पण.....
गोव्यातील जेवणाची तुम्हाला आठवण येते. काय? असे विचारले असता, आर्लेकर हसले. ते म्हणाले की, माशाची आठवण येते पण भी बिहारमध्ये शाकाहारीच जेवण जेवत असतो. सिमलाला देखील मी शाकाहारीच जेवत होतो. बिहारमध्ये ताटात जे काही शाकाहारी पदार्थ येतात, ते मला पुरेसे असतात. मी गोव्याहून स्वयंपाकी वगैरे राजभवनवर नेलेला नाही. गोव्याच्या जेवणाची आवड कधी तरी निर्माण होते. पण माझे काही अडत नाही.