Goa Election 2022: भाजपमध्ये मोठा भूकंप! उत्पल पर्रीकरनी पक्ष सोडला; पार्सेकरही अपक्ष लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:43 PM2022-01-22T13:43:30+5:302022-01-22T13:45:20+5:30
Goa Election 2022: उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांनीही विधानसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी: उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांनीही विधानसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली आणि गोव्यातील भाजपमध्ये मोठा भूकंप झाला. पार्सेकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अजून सुरू आहेत. उत्पल पर्रीकर यांनी मात्र गुरुवारी भाजप सोडला व एक नवा अध्याय सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली.
दीपक प्रभू पाऊसकर आणि इजिदोर फर्नांडिस यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आमदारकीही सोडली. आपला लढा हा तत्त्वांसाठी आहे. आपण अन्य कोणत्या मतदारसंघातून लढण्याचा प्रश्नच येत नाही, आपण पणजीतून लढतोय, अपप्रवृत्तीविरुद्ध लढतोय, असे उत्पल म्हणाले. आपल्यावर नाइलाजाने अपक्ष लढण्याची वेळ आली, असे उत्पल म्हणाले.
पार्सेकर हे मांद्रे मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. पार्सेकर म्हणाले की, आपली मनधरणी करण्यासाठी पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या वेळेला फोन करीत आहेत; परंतु आपला निर्णय पक्का आहे. दरम्यान, सावर्डेत उमेदवारी डावलेले दीपक पाऊसकर हे भाजपवर इतके नाराज झाले आहेत की, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोनही ते घेत नाहीत. काणकोणात इजिदोर यांचीही मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा आपला निर्णय बदलला नाही.
मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नव्हतो तरीही मला डावलले!
मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नव्हतो, तरीही भाजपने माझी उमेदवारी कापली, याची खंत वाटते, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनाही कल्पना दिली होती, असे पार्सेकर म्हणाले. ज्याला आपले मतदार ठाऊक नाहीत अशा माणसाला भाजप उमेदवारी देतो आणि ज्यांनी पक्ष उभा केला त्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात आहे, असे पार्सेकर म्हणाले. तुम्ही निवडून आल्यास मुख्यमंत्रिपदावर दावा कराल म्हणून तुम्हाला उमेदवारी नाकारली का, असा प्रश्न विचारला असता ते त्यांनाच ठाऊक असे पार्सेकर म्हणाले. मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नाही, मला मुख्यमंत्री बनायचे नाही, असे मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितले होते. सदानंदशेठ तनावडे यांनाही सांगितले होते, असे पार्सेकर म्हणाले. पक्षाने मला साथ दिली नाही यामुळे मी दुखावलो आहे. ज्या माणसाला मीच भाजपाची ओळख करून दिली त्याला उमेदवारी देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपचे गाेव्यातील संस्थापक सदस्यांपैकी एक असून पक्षाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी यापूर्वी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. २०१७ मधील निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावर असतानाही कॉंग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी पार्सेकर यांचा पराभव केला. नंतर आमदारकीचा राजीनामा देऊन सोपटे हे भाजपमध्ये येऊन पुन्हा निवडणूक जिंकले.
पोटनिवडणुकीत नाव हटविले
पोटनिवडणुकीवेळी उमेदवार म्हणून आपले नाव होते; परंतु ते बाजूला सारले असे उत्पल पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. ते कुणी बाजूला सारले असा प्रश्न केला असता, ते आपल्या पेक्षा तुम्हाला अधिक ठावूक आहेत, असे ते म्हणाले.
दोन तीन दिवसांत निर्णय
माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असून मांद्रेतून आता ते अपक्ष लढणार आहेत. पार्सेकर यांनीच ही माहिती दिली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण रिंगणात उतरणार असे ते म्हणाले.
पार्सेकर समर्थकांची हरमल शिक्षण संकुल सभागृहात बैठक झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष लढण्याचा आग्रह धरला. येत्या दोन तीन दिवसांत आपण याबाबत निर्णय घेऊ, असे पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना छेडले असता भाजपला सोडचिठ्ठी देऊन आपण अपक्ष रिंगणात उतरणार, असे त्यांनी सांगितले.
पार्सेकर म्हणाले की, मतदारसंघात जे प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत, ते प्रकल्प पूर्ण करायचे आहे. गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाकडे आमदाराने पहिले नाही. त्यासाठी पुन्हा रिेगणात उतरणार आहे.