गोव्यात गाजतोय बिहारचा 'मजूरवाद'; मुख्यमंत्री सावंत यांचे सुदिनकडून समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:26 PM2023-05-05T12:26:03+5:302023-05-05T12:27:05+5:30
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी लावला वेगळा सूर
पणजी : बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर गोव्यात येतात व गुन्हे करतात अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर नवा वाद सुरू झाला. गोव्यापासून बिहारपर्यंत या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. पटणा येथे मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारही करण्यात आली आहे.
राज्यातही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात असताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र काल मुख्यमंत्री सावंत यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मात्र बिहारचे राज्यपाल असलेले गोमंतकीय नेते राजेंद्र आर्लेकर यांनी वेगळा सूर लावत बिहारची बाजू घेतली आहे.
मुळीच माफी मागू नये: ढवळीकर
मुख्यमंत्र्यांनी मुळीच माफी मागू नये, असे आवाहन करीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सावंत यांनी परप्रांति यांबद्दल केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मुख्यमंत्री खरे तेच बोलले. बिहारचे मजूर येथे येतात आणि काय करतात ते आम्हाला ठाऊक आहे. मी स्वतः बिल्डर म्हणून याचा अनुभव घेतला आहे. गोव्यात बांधकाम मजूर तसेच कारागिर उपलब्ध नसल्याने बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधून मजूर आणावे लागतात. पूर्वी बिल्डर म्हणून मी दीडेकशे मजूर या राज्यांमधून आणायचो.
करार संपल्यानंतर तीन महिन्यात परत पाठवायचो. जिल्हाधिकारी यावर नजर ठेवत असत. आता ती पध्दत बंद झाली आहे. कोणीही मजूर येतो आणि येथे तळ ठोकतो. काहीजण शिस्त पाळत नाहीत. मुख्यमंत्र्यांविरुध्द बिहारात कोर्टात जाणाऱ्यांनी आम्हाला येऊन भेटावे आम्ही हे मजूर येथे काय करतात ते त्यांना दाखवून देऊ. बिहार, युपीचे सर्वचजण वाईट असे मी म्हणत नाही परंतु काहीजण गुन्हे करतात आणि इतरांचे नाव खराब होते.
जागतिक कामगारदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वरील विधानावरून त्यांच्याविरुद्ध पाटणा येथील स्थानिक रहिवासी, सत्ताधारी जद (यू) नेते मनीष कुमार चे सिंह यानी तक्रारही सादर केली आहे.
मागील काही वर्षात बिहार राज्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे, अभूतपूर्व असा विकास होण्याबरोबर बिहार देशातील विकासाच्या पथावर असणारे राज्य ठरले आहे. बिहार बिमारू राज्य' असा काही लोकांचा असलेला समज २५ वर्षापूर्वीचा आहे. सध्या तेथील प्रशासन, लोकविकास भारावून टाकणारा आहे. - राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार
प्रशासनात अनेक वरिष्ठ अधिकारीही बिहार, उत्तर प्रदेशचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाने त्यांच्याही भावना दुखावल्या असतील. या परप्रांतीय अधिकाऱ्यांवर ते विश्वास - ठेवणार का? परप्रांतीय कामगार आणि अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीने भावना दुखवणे चुकीचे आहे. -गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते