300 वैद्यकीय आस्थापनातील कचरा ठरला मडगाव पालिकेसाठी नवी डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 02:43 PM2019-11-05T14:43:30+5:302019-11-05T14:46:11+5:30
मडगावातील सुमारे 300 वैद्यकीय आस्थापनांकडून तयार होणारा वैद्यकीय कचरा ही नवीन डोकेदुखी बनली आहे.
मडगाव - व्यावसायिकदृष्टय़ा गोव्यातील सर्वात गजबजलेले शहर असलेल्या मडगावात एकाबाजूने पालिकेसाठी सुक्या कचऱ्याचे डोंगर हा डोकेदुखीचा विषय बनलेला असतानाच मडगावातील सुमारे 300 वैद्यकीय आस्थापनांकडून तयार होणारा वैद्यकीय कचरा ही नवीन डोकेदुखी बनली आहे. मडगावात 47 इस्पितळे असून दवाखान्यांचीही संख्या 252 एवढी प्रचंड आहे. या 299 वैद्यकीय आस्थापनात तयार होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची कुठलीही सोय पालिकेकडे नसल्याने या कचऱ्याचे करावे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.
वास्तविक वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट त्या त्या आस्थापनाने स्वत: लावायची असतानाही मडगावातील इस्पितळे एकतर हा कचरा सुक्या कचऱ्यात मिसळून पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करतात किंवा सरळ उघड्यावर टाकून देतात हे लक्षात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मोतीडोंगर भागात एका दवाखान्याचा कचरा एका गोणीत भरुन झुडपात टाकून दिल्याचे दिसून आल्यानंतर या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली होती.
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या कचऱ्याचे कसे व्यवस्थापन करता येईल याची चर्चा करण्यासाठी बैठक झाली. सध्या मुरगाव नगरपालिका आणि पणजी महानगरपालिका एका एजन्सीद्वारे त्या त्या शहरातील वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे. या दोन्ही पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सध्या आम्ही संपर्क साधला आहे. ते कशारितीने हा कचरा हाताळतात त्याची माहिती मागितली आहे. त्याशिवाय ज्या एजन्सीकडून हे काम केले जाते त्या एजन्सीचीही माहिती मागितली असल्याचे नाईक यांनी सांगितले.
सध्या गोव्यात केवळ पणजी व मुरगाव या दोनच ठिकाणी वैद्यकीय कचऱ्याची पालिकेमार्फत विल्हेवाट लावली जाते. गोव्यातील वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी फोंडा तालुक्यातील कुंडई येथे नवीन प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. मात्र हा प्रकल्प उभा होण्यास आणखी किमान दोन वर्षे जातील. त्या अवधीत गोव्यातील सर्व पालिकांसाठी हा वैद्यकीय कचरा डोकेदुखी बनणार आहे.
दरम्यान, असा वैद्यकीय कचरा नगरपालिका कामगारांसाठीही घातक ठरु शकतो. या कचऱ्याशी कामगारांचा संपर्क आला तर त्यांना साथीचे रोग होऊ शकतात. त्यामुळे वैद्यकीय आस्थापनांनी अशा निष्काळजीपणे हा कचरा फेकून देऊ नये असे आवाहन नाईक यांनी केले आहे. ते म्हणाले, गांधी मार्केटातील खाटीक सुद्धा आपला कचरा व्यवस्थित वर्गीकृत करुन पालिकेकडे देतात. जर खाटीक अशी काळजी घेत असतील तर डॉक्टरांनीही ती घ्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.