साहित्यिक विष्णू वाघ यांच्या पुस्तकाविरुद्धचा एफआयआर मागे घेणार, मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याचा भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 02:54 PM2017-10-24T14:54:59+5:302017-10-24T14:55:35+5:30
मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त या कवितासंग्रहाविरूद्ध पोलिसांत नोंद झालेला एफआयआर साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मागे घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्याचा दावा प्रदेश भाजपाने मंगळवारी केला.
पणजी- मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त या कवितासंग्रहाविरूद्ध पोलिसांत नोंद झालेला एफआयआर साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मागे घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्याचा दावा प्रदेश भाजपाने मंगळवारी केला.
गोव्यात वाघ यांच्या सुदिरसुक्त या कवितासंग्रहातील काही कविता वादग्रस्त ठरल्या असून त्यावरून गोव्यात बहुजनविरूद्ध उच्चवर्णीय असा तीव्र वैचारिक वाद पेटला आहे. सरकारने नुकताच या पुस्तकाचा प्रस्तावित सरकारी पुरस्कारही रद्द केला. सोशल मीडियावरून सरकारवर काहीजण टीका करत आहेत तर काहीनी समर्थन चालवले आहे. महाराष्ट्रातील कवी अरूण म्हात्रे, महेश केळुस्कर आदींनी वाघ यांच्या कवितासंग्रहाविरूद्ध पोलिसांत नोंद झालेल्या गुन्ह्याबाबत सोशल मिडियावरून निषेध केला आहे. कवितांमधून उच्चवर्णीयांना दोष देण्यात आला असल्याचा गोव्यातील कोकणी काव्य क्षेत्रातील काहीजणांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर आता प्रथमच भाजपाने या वादात उडी टाकली आहे. पण भाजपाने वेगळी भूमिका घेत वाघ यांच्या सुदिरसुक्तचे समर्थन केले. भाजपाचे उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी पक्षाच्या सूचनेनुसार मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. वाघ यांच्या पुस्तकात काहीच आक्षेपार्ह नाही. अकारण त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली गेली आहे असे होबळे म्हणाले. वाघ यांनी सामान्य माणसाची भाषा पुस्तकात वापरली आहे. ती भाषा अश्लील नाही. यापूर्वीही पुंडलिक नाईक, दामोदर मावजो आदी गोमंतकीय लेखकांनी अशी भाषा वापरलेली असून त्यावरून कधीच वाद झाला नव्हता असे होबळे म्हणाले.
आपण मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटून चर्चा केली आहे. वाघ हे अत्यंत आजारी असून ते बोलू सुद्धा शकत नाहीत. अशावेळी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल होणे गैर ठरते असे होबळे म्हणाले. सरकार हा विषय वाढवणार नाही, तज्ज्ञांशी बोलून
पोलिस स्थानकातील एफआयआर बंद केला जाईल अशी ग्वाही पर्रीकर यांनी दिल्याचे होबळे यांनी सांगितले. समाजाच्या तळागाळातील लोक जी भाषा वापरतात, तिच भाषा वाघ यांनी सुदिरसुक्तमध्ये वापरली आहे असे होबळे म्हणाले.