'३० पार'ची घोषणा काँग्रेसने चोरली, आमदार सांभाळून ठेवायला शिका; सोपटेंचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2024 08:26 AM2024-06-07T08:26:35+5:302024-06-07T08:28:08+5:30
भाजपचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसला राखण्यात यश आल्यामुळे आता काँग्रेसवाले भलत्याच भ्रमात राहून घोषणा करू लागले आहेत. २०२७च्या विधानसभा निवडणुकीत '३० पार' ही घोषणा भाजपची असून, ती काँग्रेसने चोरल्याचा आरोप भाजपचे नेते माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केला.
पणजी मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत आमदार संकल्प आमोणकर व प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर उपस्थित होते.
सोपटे म्हणाले की, उत्तर गोव्यात १७ आणि दक्षिण गोव्यात ८ मिळून २५ विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी मिळविली आहे. शिवाय ५ मतदारसंघात काँग्रेसला नाममात्र आघाडी मिळाली आहे. त्यामुळे एकूण ३० मतदारसंघात येत्या निवडणुकीत भाजपला विजय मिळविण्यासाठी पूर्ण संधी आहे, असे ते म्हणाले. भाजपचा हा निष्कर्ष काँग्रेसने चोरून आपल्या नावाने खपविल्याचाही आरोप त्यांनी केला. काँग्रेस जरी आता इंडिया आघाडीच्या गोष्टी करीत असली तरी ही आघाडी टिकणार नाही. १३ आमदार निवडून आले होते, त्यातील किती राहिलेत ते काँग्रेसे पाहावे, असा टोलाही त्यांनी हाणला.
संकल्प आमोणकर म्हणाले की, भाजपच्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा अधिक आहे. केवळ तीन मतदारसंघात मोठी आघाडी मिळाल्यामुळे काँग्रेसचा विजय झाला आहे. परंतु, इतर सर्व ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. इंडिया आघाडीच्या नावाने शंख वाजविणाऱ्यांनी या आघाडीची काय दशा झाली आहे ते अगोदर पाहावे. देशभरात भाजपला २४१ जागा, तर एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत, हेही पाहावे, असे आमोणकर म्हणाले.
२०२७ मध्ये मांद्रेत भाजप आमदार
दयानंद सोपटे हे २०२७ मध्ये भाजपला राज्यात ३० जागा मिळतील इतके सांगून थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले की, त्यांच्या मांदे मतदारसंघातही भाजपचा आमदार निवडून येणार आहे. त्यांचा हा टोला अप्रत्यक्षपणे भाजप सरकारला पाठिंबा असलेले मांद्रेतील मगो आमदार जीत आरोलकर यांना होता, हे लपून राहिले नाही.
'त्या' ३० जागा आमच्याच : रवी
काँग्रेसचे काही नेते आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांनी स्वप्ने पाहणे सोडावे. भाजपने वेगवेगळ्या योजनांद्वारे तळागाळात काम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्या ३० जागा आमच्याच असतील, असे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. तसेच लोकसभेत उमेदवाराचा पराभव का झाला? याची कारणमीमांसा शोधली जाईल. आता आगामी विधानसभेच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागणार आहोत, असेही ते म्हणाले.