भाजपचं ठरलं! फोंडा, साखळी पालिका स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:34 AM2023-04-11T08:34:09+5:302023-04-11T08:35:02+5:30
कोअर कमिटीच्या बैठकीत रणनीती निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मगोप सरकारमध्ये घटक अपक्ष असला तरी फोंडा पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. फोंडा आणि साखळी दोन्ही पालिका निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सोमवारी कोअर कमिटीच्या बैठकीत दोन्ही पालिकांमध्ये भाजपचा झेंडा फडकावा यासाठी प्रमुखही नेमण्यात आले. फोंड्याची जबाबदारी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याकडे तर साखळीची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे दिली आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मगोपकडे भाजपची युती विधानसभा निकालानंतर झालेली आहे. फोंडा पालिका निवडणुकीसाठी युतीचा प्रश्नच नाही. तिथे रवी नाईक हे भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. साखळीतही मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडून आलेले आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार असताना आणखी कोणाकडे युतीचा प्रश्न येतोच कुठे?. फोंडा पालिकेत नेहमीच मगोपचे वर्चस्व राहिले आहे. गेल्यावेळीही सुरुवातीला ही पालिका मगोपकडेच होती. नंतर स्थित्यंतरे होऊन रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक नगराध्यक्ष बनले व सत्ता भाजपकडे आली. मगोपने यावेळी पालिका निवडणूक न लढवता बाजूला राहावे, असे भाजप या पक्षाच्या नेत्यांना सांगणार आहे का? असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर होत नाही, त्यामुळे निशाणी नसणार, कोणी जर अपक्ष म्हणून लढत असेल तर त्यांना अडवण्याचा प्रश्नच येत नाही. दोन्ही पालिकांमध्ये भाजपने पूर्णपणे स्वबळावरच उतरण्याचे निश्चित केले.
- फोंड्याची जबाबदारी विनय तेंडुलकर यांच्याकडे
- साखळीची जबाबदारी सदानंद तानावडे यांच्याकडे
- साखळी पालिकेवर गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे धर्मेश सगलानी गटाचे वर्चस्व होते. ही निवडणूक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
- रविवारी मुख्यमंत्र्यांनी काही विद्यमान नगरसेवक, संभाव्य उमेदवार तसेच मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
- काँग्रेस व इतर पक्षांच्या आघाडीवर मात्र याबाबत सामसूम आहे. साखळीत प्रवीण ब्लॅगन 'टू गेदर फॉर साखळी पॅनेल केले असून, उमेदवारही निश्चित केल्याची माहिती मिळते.
उमेदवारही निश्चित
भाजपने दोन्ही पालिकांत बहुतांश प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित केले आहेत. अवघेच काही प्रभाग आहेत तेथे भाजपकडून, उमेदवारांसाठी चाचपणी चालू आहे. काही विद्यमान नगरसेवक आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी लॉबिंग करीत आहेत.
पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या १८ तारखेपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत अर्ज सादर करता येतील. १४ रोजी सार्वजनिक सुटी असून, १६ रोजी रविवार असल्याने हे दोन दिवस अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"