भाजपकडूनच भाजपचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 01:07 PM2024-06-16T13:07:41+5:302024-06-16T13:08:49+5:30
या रागाचा एकत्रित परिणाम म्हणून यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला.
सद्गुरू पाटील, निवासी संपादक, गोवा
काही मंत्री, आमदार पक्षातून फुटतात, दुसऱ्या पक्षात जातात. काहीजण काँग्रेसमधून भाजपमध्ये येतात. गरज नसताना भाजपकडून आमदारांची प्रचंड आयात केली जाते. फोडाफोडीचे राजकारण केले जाते. भाजपमध्ये मूळ कार्यकर्ते आणि आयात केलेले कार्यकर्ते असे दोन गट एकमेकांविरुद्ध असतात. विविध कारणांमुळे लोकांमध्ये राग आहे. या रागाचा एकत्रित परिणाम म्हणून यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीवेळी केवळ खिस्ती मतदारांमुळे भाजपचा पराभव झाला, असे म्हणणे हे अर्धसत्य ठरते. ते पूर्णसत्य होत नाही. भाजपच्या काही मंत्री, आमदारांनी पल्लवी धेपे यांच्यासाठी जास्त कष्ट घेतलेच नाही, हिंदू मतदारांचे प्राबल्य असलेल्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार व मंत्र्यांनी लोकांना गृहीत धरले. हे लोक आपल्यालाच मते देतील, कारण, केंद्रात त्यांना पुन्हा मोदी सरकार आलेले हवे आहे, असा समज गोव्यातील भाजप नेत्यांनी करून घेतला. सांगे, सावर्डे, काणकोण मतदारसंघ किंवा फोंडा तालुका किवा मुरगाव तालुका अशा ठिकाणी मतदानाचे प्रमाण वाढले. हे प्रमाण आपल्यासाठीच वाढले आहे. हिंदू मतदार आपल्यालाच सगळी मते देतील, असा गोड गैरसमज भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांनी करून घेतला होता.
मगो पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांचाही समज तसाच होता आणि मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे तानावडे यांनाही तसेच वाटत होते. माझ्याशी त्यावाचत मतदानानंतर तीन-चारवेळा बोलले होते. मात्र, हिंदू मतदारांना गृहीत धरता येत नाही, असा संदेशही भाजपला दक्षिणेच्या निकालातून मिळाला आहे.
ख्रिस्ती किंवा मुस्लिम मतदारांची मते भाजपला कधी जास्त प्रमाणात मिळत नसतातच. यावेळी अल्पसंख्याक जास्त संघटित होते, हे मान्य करता येईल. सासष्टी तालुक्यात ६१ हजार मतांची लीड काँग्रेसला मिळाली है समजता येते. मात्र, कुडचडे, सांगे, सावर्डे मतदारसंघ तसेच फौंडा तालुका व अन्य भागांमध्ये जिथे हिंदू मतदार जास्त आहेत, तिथेही यावेळी भाजपने मार खाल्ला आहे. प्रत्येक मंत्री व आमदार अगोदर मुख्यमंत्र्यांना सांगत होता की, आपण दहा हजारांची लीड देईन.
दिगंबर कामत यांनी आपण पाच हजारांची आघाडी देईनच, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना सांगितले होते. संकल्प आमोणकर व दाजी साळकर यांनीही खूप मोठा आकडा सांगितला होता; पण सर्वांचा फुगा फुटला, माजी मंत्री बाबू कवळेकर यांनी आपण चार हजार मतांची लीड केपेत पल्लवी छेपे यांना देईन, असे आहीर केले होते. प्रत्यक्षात केपे मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली. भाजपला एका मताचीदेखील लीड तिथे मिळाली नाही. हिंदू एसटी समाजाची मते यावेळी जबरदस्त फुटली. एसटी समाजाला भाजप गृहीत धरू शकत नाही हे मुख्यमंत्र्यांनाही कळून आले.
हिंदू एसटी समाजाची बरीच मते काँग्रेसला व आरजीच्या उमेदवाराला गेली, फोंडा तालुका, सांगे, काणकोण, सावर्डे वगैरे भागांतील मतदानाचा जर कुणीही अभ्यास केला तर आरजीला हिंदू एसटी बांधवांची बऱ्यापैकी मते मिळाली, हे कळून येईल. आरजीला ख्रिस्ती मते जास्त मिळालेली नाहीत. भाजपच्या अनेक मंत्री, आमदारांना स्वतःचे वागणे आता बदलावे लागेल, केवळ पाद्रींनी आमचा घात केला, असे सांगून भाजपचे आमदार स्वतःचे अपयश लपवत आहेत.
ख्रिस्ती मतदारांनी आम्हाला मते दिली नाहीत व त्यामुळे पल्लवी धेंपे हरल्या असे मंत्री, आमदारांनी सांगणे म्हणजे वेड पांघरुण पेडगावला जाण्यासारखे झाले. वाहन नीट चालवता येत नाही, तेव्हा काहीवेळा रस्त्यावरील खड्यांना दोष दिला जातो. अनेक हिंदू मतदारांनीही भाजपला यावेळी दक्षिण गोव्यात मतदान
का केले नाही, याचा शोध पक्षनेतृत्वाला घ्यावा लागेल. लोकांना मोदींवर राग नव्हता, तर गोव्यातील काही मंत्री, आमदार व त्यांच्या कारभारावर राग होता आणि आहे.
लोकांशी काही आमदार, मंत्री नीट वागत नाहीत, अशाप्रकारची भावना अनेक सामान्य माणसे व्यक्त करीत असतात. सरकारी खात्यांमध्ये नीट व जलद गतीने कामे होत नाहीत. पणजीत स्मार्ट सिटीचा प्रचंड घोळ सरकारने जसा घातलाय, तसाच दक्षिण गोव्यातही काही प्रकल्पांबाबत रडगाणे सुरू आहे. लोकांना सामाजिक सुरक्षा किंवा अन्य योजनांचे पैसे काहीवेळा वेळेत मिळत नाही. अनेक व्यावसायिकांना छोट्या छोट्या कामांसाठी त्रास भोगावे लागतात.
सरकारी अधिकारी, काही कर्मचारी, पंचायती, पालिका लोकांची कामे करीत नाहीत. काही अधिकारी पैशांची अपेक्षा व्यक्त करतात. काही आमदार किंवा मंत्री बिल्डरांसह अन्य घटकांना छळतात, या सगळ्यांमुळे मतदारांच्या मनात राग आहे. काही मंत्री, आमदार पक्षातून फुटतात, दुसऱ्या पक्षात जातात, काहीजण काँग्रेसमधून भाजपमध्ये येतात, गरज नसताना भाजपकडून आमदारांची प्रचंड आयात केली जाते. काही आमदारांची पक्षाकडून खरेदी केली जाते, अशा प्रकारची तीव्र भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळेच लोकांमध्ये राग आहे.
या रागाचा एकत्रित परिणाम म्हणून यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला. समजा खलपांऐवजी उत्तर गोव्यात काँग्रेसने दुसरा एखादा प्रबळ उमेदवार उभा केला असता, तर उत्तरेत देखील भाजपच्या मतांचे प्रमाण कमी झाले असते, असे काही राजकीय विश्लेषक मानतात. सत्तरी व डिचोली तालुक्यातच भाजपला ७० हजार मतांची आघाडी मिळाली. उत्तरेतील अन्य तालुक्यांतही भाजपचे आमदार व मंत्री असले तरी तिथे जास्त आघाडी भाजपला मिळालेली नाही.
पूर्ण दक्षिण गोव्यात विरियातो फर्नाडिस यांना लोक ओळखतच नव्हते. दोन वर्षांपूर्वीच दाबोळी मतदारसंघात विरियातो विधानसभा निवडणूक हरले होते. त्याच विरियातींना पूर्ण दक्षिण गोवा दोन वर्षानंतर डोक्यावर घेतो व निवडून देतो. हे केवळ पार्दीमुळे घडलेले नाही. भाजपच्या काही मंत्री, आमदारांनी लोकसभा निवडणूक सहज घेतली होती. शिवाय, त्यांच्याप्रति असलेल्या रागामुळे लोकांनी काँग्रेसला मते दिली.
पल्लवी धेंपे यांनी स्वतः खूप कष्ट घेतले होते. त्यांनी खूप प्रचार केला होता. त्यांच्यासाठी नरेंद्र सावईकर अन्य काही नेत्यांनी गंभीरपणे प्रचार केला होताच. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही खूप घाम गाळला होता, पण भाजपच्या ज्या मंत्री आमदारांनी आपण प्रचंड लीड देतो असे जाहीर केले होते, ते मंत्री, आमदार कमी पडले. आलेक्स सिक्वेरांपासून दाजी, संकल्पसह अनेकजण कमी पडले, मडगावमध्ये भाजपला केवळ बाराशे-तेराशे मतांची लीड मिळणे हा फार मोठा धक्का आहे.
दक्षिण गोव्यात एकूण सुमारे ४ लाख ४७ हजार लोकांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापैकी पल्लवी धेंपे यांना २ लाख ४ हजार ३०१ म्हणजे ४५ टक्के मते मिळाली. काँग्रेसचे विरियातो यांना २ लाख १७ हजार ८३६ मते प्राप्त झाली. म्हणजे ४८ टक्के मते विरियातोंनी प्राप्त केली. विरियातो यांना सासष्टीत ६३ हजार मतांची आघाडी मिळाली, कुंकळ्ळी मतदारसंघात देखील भाजपचे अनेक नेते कमी पडले. अर्थात हा आता इतिहास झाला, पण यापुढे भाजपला खूप बदल सगळीकडे करावे लागतील, तसेच गोवा सरकारला स्वतःचा कारभार सुधारून स्वतःची प्रतिमा देखील लोकांत बदलावी लागेल. अन्यथा, भाजपसाठी २०२७ सालची विधानसभा निवडणूकही मोठी अडचणीची ठरू शकते.