भाजपचे 'गाव चलो'; निवडणूक प्रभारी सूद यांनी घेतला लोकसभेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 11:14 AM2024-01-30T11:14:29+5:302024-01-30T11:15:39+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी आशिश सूद यांनी काल, सोमवारी कोअर कमिटीचे पदाधिकारी आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम आटोपल्याने आता भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुन्हा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत आता राज्यात ९, १० व ११ फेब्रुवारी असे तीन दिवस भाजपचे 'गाव चलो अभियान' चालणार आहे. सर्व १,७२२ बूथवर प्रमुख कार्यकर्ते जातील. एका बुथवरील कार्यकर्ता दुसऱ्या बूथवर जाईल. पक्षाचे नेतेही प्रत्येक बूथला भेट देतील असे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आशिश सूद यांनी या मोहिमेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाकडून चालू असलेल्या तयारीचाही आढावा घेतला.
जोरदार तयारी : मुख्यमंत्री
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असे सांगितले की, 'आशिश सूद यांची नव्यानेच गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी या बैठकीत प्रत्येकासोबत ओळख करुन घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीची तयारी व आगामी गाव चलो अभियानबद्दल मार्गदर्शन केले. भाजपकडून लोकसभेसाठी जोरदार तयारी चालू आहे.'
भोम ग्रामस्थांनी घेतली भेट
दरम्यान, आशीश सूद यांची भोम येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विस्ताराच्या प्रश्नावर भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या महामार्ग विस्ताराबाबत फेरविचाराची मागणी निवेदनात केली आहे.