गोव्यात भाजपा सरकारचा शपथविधी अडचणीत? कॉंग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2017 10:01 PM2017-03-13T22:01:13+5:302017-03-13T22:10:11+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे मनोहर पर्रीकर उद्या पदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपाला कमी जागा मिळाल्या असून त्यांचा सरकार स्थापन करण्याचा निर्णय
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे मनोहर पर्रीकर उद्या पदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपाला कमी जागा मिळाल्या असून त्यांचा सरकार स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत याविरोधात कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शविली आहे. याबाबत उद्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सुनावणी होणार आहे.
भाजपाने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्यात दावा केला आहे. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली असून गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पार्टीला बहुमत मिळाले नसून कॉंग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाला 13 जागा मिळाल्या आहेत. भाजपाने अन्य पार्टीच्या सदस्यांना सोबत घेऊन जादुई आकडा गाठण्याचा दावा केला आहे.
भाजपाचे सरकार नियमबाह्य असल्याचा कॉंग्रेसने आरोप केला असून गोव्यात कॉंग्रेस मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी बोलविले नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी कॉंग्रेस नेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार असून कॉंग्रेसची बाजू अभिषेक मनू सिंघवी कोर्टात मांडणार आहेत. त्यामुळे भाजपाचा उद्याचा शपशविधी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
तसेच, कॉंग्रेस उद्या संसदेत गोवा आणि मणीपूरमध्ये सरकार स्थापनेबद्दलचा मुद्दा लावून धरणार आहे.
Appealed SC that Parrikar's appt as Goa CM be quashed,SC admitted petition will be heard at 11am tomorrow: Sunil Kawthankar, Goa Cong Spox pic.twitter.com/smo77ZcLoQ
— ANI (@ANI_news) March 13, 2017