भाजपच कॅसिनोत गुंतलेले
By admin | Published: August 29, 2015 02:44 AM2015-08-29T02:44:55+5:302015-08-29T02:47:11+5:30
मडगाव : एकेकाळी जो भाजप कॅसिनोला विरोध करीत होता तेच आता या व्यवसायाला खतपाणी घालत असून मांडवीतून कॅसिनो आॅफ शॉवर नेण्यासाठी या सरकारने कंबर कसली आहे.
मडगाव : एकेकाळी जो भाजप कॅसिनोला विरोध करीत होता तेच आता या व्यवसायाला खतपाणी घालत असून मांडवीतून कॅसिनो आॅफ शॉवर नेण्यासाठी या सरकारने कंबर कसली आहे. भाजपाचे मंत्रीच कॅसिनो प्रकरणात गुंतल्याचा आरोप कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. फ्रान्सिस सार्दिन यांनी भाजपाशी मोट बांधून सरकार स्थापन केले होते तेव्हा या सरकारनेच राज्यात पहिल्या कॅसिनोला परवाना दिला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
ते म्हणाले, कॅसिनोला सर्व संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. प्रत्येकजण कॅसिनोला विरोध करीत आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर असताना कॅसिनो बंद करा, असे भाजपावाले सांगत होते. मांडवीतून आॅफ शोवर नेण्याची मागणी करीत होते. आता भाजपाचे मंत्री या कॅसिनो प्रकरणात गुंतले आहेत. मात्र, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर दोन दिवस थांबा म्हणून सांगत आहेत.
ते म्हणाले, कॅसिनोवरती २० टक्के गोमंतकीय कामगार कामाला नाहीत. गोमंतकीयांना छोटी कामे दिली जातात, तर नेपाळींना चांगल्या पदाची कामे दिली जातात व त्यांना पगारही चांगला असतो. तसेच त्यांना प्रवासाची सोय, राहाण्याची व्यवस्था व भत्ता दिला जातो. तर गोमंतकीय कामगारांना सुट्टी दिली जात नाही. कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. उलट त्यांना उद्धट वागणूक दिली जाते. आपल्याला गोमंतकीय कामगारांचे फोन कॉल, पत्र येत असतात. गोमंतकीय कामगारांची सतावणूक केली जात आहे. आपण गोमंतकीय कामगारांच्या बाजूने असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. (प्रतिनिधी)