भाजपा नेत्यांनी आधी माफी मागावी त्यानंतरच राम मंदिरावर चर्चा : राजमोहन गांधी
By Admin | Published: April 6, 2017 03:03 PM2017-04-06T15:03:59+5:302017-04-06T15:03:59+5:30
राममंदिर उभारण्याच्या चर्चेची पूर्वअट ही मशीद पाडण्यासाठीची जबाबदारी स्वीकारून माफी मागणे अशीच राहिल, असे स्पष्ट प्रतिपादन गांधीजींचे नातू आणि विचारवंत राजमोहन गांधी यांनी केले.
ऑनलाइन लोकमत/राजू नायक
पणजी, दि. 6 - राममंदिर उभारण्याच्या चर्चेची पूर्वअट ही मशीद पाडण्यासाठीची जबाबदारी स्वीकारून माफी मागणे अशीच राहिल, असे स्पष्ट प्रतिपादन गांधीजींचे नातू आणि विचारवंत राजमोहन गांधी यांनी केले. मडगाव शहरात दक्षिणायन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी बुधवारी झालेल्या अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, आधी भाजपा नेत्यांनी मशीद पाडल्याप्रकरणी माफी मागावी, आणि त्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करायची का हे आम्ही ठरवू. माझी तरी वैयक्तीकरित्या हीच अट राहील. खोटे बोलण्याचा मक्ता संघाच्या नेत्यांनी घेतला असून सावरकर त्यात माहीर होते, असे ते म्हणाले.
मशीद पाडल्यानंतर दिसलेली प्रवृत्ती सावरकरांच्या वर्तनासारखीच आहे. जे चिथावण्या देत आणि स्वत: मात्र नामानिराळे राहत, असे त्यांनी सांगितले. तुम्ही जर एखादे कृत्य केले असेल तर त्याची जबाबदारी स्वीकारण्याचीही तयारी पाहिजे. सावरकरांनी नेहमीच पळपुटेपणा केला, उलट गोडसे यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले, परंतु गांधी खुनासाठी सावरकरांची चिथावणीच कारण होती आणि इतरही अशा प्रकारची हिंसक कृत्ये त्यांनी घडवून आणली, परंतु आपले हात मात्र झटकले असे त्यांनी सांगितले.
सीरियामध्ये चालू असलेली हिंसा आणि वायू हल्ल्यामध्ये निरपराधांचे प्राण घेण्याच्या घटनेबद्दल देशातील मानवतावादीही मूग गिळून गप्प असल्याचा प्रकार हा मुस्लीम द्वेषातून तर घडत नसावा ना असा प्रश्न राजमोहन गांधी यांनी केला. जर्मनीमध्ये हिटलरने ज्यूंना लक्ष बनविले आणि ज्यूंना विरोध हा राष्ट्रवाद बनवला त्याच प्रकारातून देशात मुस्लीमविरोधी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे सीरियातील कत्तलींकडे आपण मुस्लीमांच्या तिरस्कारीत नजरेतून पाहत आहोत, असे ते म्हणाले.
गांधीजी नसते तर भारताची राज्यघटना कधीही सेक्युलर बनली नसती कारण देशाचे झालेले विभाजन आणि प्रचंड रक्तपाताच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला मुस्लिमांविरोधातील तिरस्कार यामुळे हा धोका होता. घटना बनवण्यात बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोठे असले तरी गांधीजींमुळेच घटनेचा मूळ गाभा धर्मनिरपेक्ष राहिला, असे त्यांनी सांगितले. भारतापेक्षा पाकिस्तानात धर्मनिरपेक्ष चळवळी जोरात असून त्यांचे कार्य अधिक ठाशीव आणि बांधिलकीतून चालले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दुर्दैवाने आपली प्रसारमाध्यमे त्यांच्या चळवळींची अगदीच दखल घेत नाहीत, असे ते म्हणाले.
भारतातील धर्म निरपेक्ष चळवळींनी मोदींची दौड कितीही वेगाने चालली असली तरी आत्मविश्वास गमावता कामा नये, त्यांनी सतत नवीन माणसे जोडली पाहिजेत आणि नवीन ताकद निर्माण केली पाहिजे. लोकशाही संस्थांचे जतन तर झालेच पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उत्तरप्रदेशात भाजपाविरोधी मतांची संख्या ५६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे नाउमेद होण्याचे कारण नाही, असा सल्ला त्यांनी दिला. काँग्रेस पक्षाची सध्याची कार्यपद्धती निराशाजनक असली तरी पक्षाचे नेतृत्व चुका सुधारण्याचा प्रयत्नही करत आहे. काही राज्यांमध्ये पक्षसंघटनेची पुनर्रचना केली जात आहे ही दिलासादायक बाब आहे.
सध्यातरी भाजपाशी टक्कर देण्याच्या स्थितीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच असून सर्व छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्र येऊनच भाजपाला अडविले पाहिजे,असे ते म्हणाले. आपची उमेदवारी यापूर्वी मिळवलेले राजमोहन गांधी त्या पक्षाबाबत मात्र फार आशावादी नव्हते. महात्मा गांधीजींचा चुका शोधण्याचा प्रयत्न करू नये कारण गांधी सुद्धा मानवच होते. गांधीजींनी आपले वारस जवाहर नेहरू असतील, असे जाहीरपणे कधीही सांगितलेले नाही, परंतु आपल्या मृत्यूच्या एकच दिवस आधी काँग्रेस महासमितीला उद्देशून एक पत्र लिहिले, त्यात हा उल्लेख मात्र जरूर केला होता, अशी माहिती त्यांनी दिली. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्या सर्व अनुययांची एक बैठक विनोबा भावे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात नेहरूंकडेच नेतृत्वाची धुरा सोपविणे योग्य असे मत व्यक्त झाले होते, त्यात किरकोळ मतभेद व्यक्त झाले होतेच, परंतु बैठकीतील सूर नेहरूंच्या बाजूचा होता, असे राजमोहन गांधी यांनी स्पष्ट केले.