Goa Election 2022: भाजपने सुवर्णसंधी गमावली; संघाने राजकीय शरणागतीसाठी मूळ धारणाही बदलल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 05:07 PM2022-01-16T17:07:54+5:302022-01-16T17:09:02+5:30
गोव्यात सध्या या तर्कदोषानेच "संघाला" ग्रासले आहे, कमजोर, हतबल केले आहे आणि त्याचबरोबर राजसत्तेवर अवलंबित बनवले आहे.
सुभाष वेलिंगकर
आर्चबिशपला, सत्तेसाठी दिलेली वचने पाळण्यासाठी, मातृभाषांशी द्रोह केलेले पर्रीकर व भाजपाला आपली पापे निवडणुकीपूर्वी उकरून काढली जाऊ नयेत यासाठी, भारतीय भाषा सुरक्षा मंचचे आंदोलन चिरडून टाकायचे होते. निमंत्रक असलेल्या सुभाष वेलिंगकरांना निष्प्रभ करून आणि सर्वप्रकारची दडपणे सत्तेच्या आधाराने त्यांच्यावर आणून, त्यांना आंदोलनातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी पर्रीकर व भाजपाने अनेक मार्ग अवलंबले. ज्या आंदोलनाला आतापर्यंत (भाजपाविरोधात ) सर्वसंमतीने व सर्व स्तरांवर साथ दिली, त्याच संघनेतृत्वाने केंद्रीय भाजपाच्या फतव्यासमोर अक्षरश: नांगी टाकून तेच आंदोलन चिरडून टाकण्याच्या, आर्चबिशपांना कटिबद्ध असलेल्या पर्रीकरांनी अवलंबलेल्या मार्गाला, घूमजाव करून साथ देण्याचा पूर्णत: आपल्याच तत्वांशी व सिद्धांतांशी विसंगत व मारक असा अनपेक्षित, अकल्पनीय निर्णय घेतला!
श्रद्धांना तडा देणारे संघाचे रूप!
एक वर्षभर आंदोलनात सक्रियपणे, भाजपाच्या विरोधातही पाठीशी राहिलेल्या संघाने, निव्वळ राजकीय दबावाला बळी पडून दाखवलेले हे रूप सत्तेच्या बाजूने राहिलेले मूठभर स्वयंसेवक, तसेच संपूर्ण आंदोलनात "पोटातील पाणी" ही हलवू न देता अलिप्त, निष्क्रिय, अजाण राहिलेले असे काहीजण सोडल्यास, उर्वरित सुमारे ९५ टक्के स्वयंसेवक व कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक तसेच अत्यंत वेदनादायकही होते! असंख्य स्वयंसेवक वर्षानुवर्षे संघाचे कार्य अविचलपणे व सातत्याने करत राहिले ते एकाच विश्वासाच्या व श्रद्धेच्या आधारावर! तो आधार म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही दडपणाला बळी न पडता, आपल्या सिद्धांतांशी, तत्वांशी, नैतिक मुल्यांशी कधीच तडजोड न करणारी संस्था म्हणजे संघ!
२०११-१२ च्या आंदोलनात काँग्रेसविरोधात उभे राहणे, हे संघासाठी स्वाभाविक होते. (त्याचसाठी तर गोव्यात 'भाजपा'चा समर्थ पर्याय संघाने उभा केला होता!) परंतु भाजपाने मातृभाषा-रक्षणाबाबत आणि प्राथमिक स्तरावर परकीय इंग्रजीला, अल्पसंख्यांक अनुनयासाठी, अनुदान न देण्याच्या वचनाबाबत जो विश्वासघात केला, त्यामुळे भाभासुमंला आता २०१५-१६ पासून चक्क भाजपाच्या विरोधातच आंदोलन करणे भाग पडले. त्यावेळी संघाने मातृभाषा-रक्षणाच्याच बाजूने उभे राहण्याचा दृढ निर्धार केला. आणि तोही, आपणच जन्माला घालून गोव्यात सर्वतोपरी पोसलेल्या भाजपाच्या विरोधात. हा लढा मातृभाषा माध्यम व अनुदान प्रश्न, निर्णायक होईपर्यंत आणि पूर्ण शक्तीनिशी संघ स्वयंसेवकांना पुढे न्यायचे आहे अशी ग्वाही देणारे आवाहन करून जेव्हा गोवा संघामागे कोकण-प्रांत संघ उभा राहिला, तेव्हा संघ सिद्धांताशी कधीच तडजोड करत नाही, याबाबत सर्व स्वयंसेवकांचा विश्वास अधिकच दृढ झाला होता! परंतु, हाय रे दुर्भाग्य! केंद्रीय भाजपाने डोळे वटारल्यानंतर थेट १८० अंशात 'घूमजाव' करून, आंदोलनच चिरडण्याचे पर्रीकर व भाजपाचे विकृत, अनैतिक मनसुबे पूर्ण करण्याकरता, भाजपाला जे हवे, जसे हवे, तसे करण्याचा लज्जास्पद, संघ-परंपरेला न शोभणारा आत्मघातकी निर्णय घेतला. भाजपाने मातृभाषेच्या खूनापासून ते अन्य सर्व पापांचे समर्थन करण्याचा विडा उचलला!
अध:पतित भाजपासाठी संघाचे अस्तित्वच पणाला लावणारा, संघाला भाजपाच्या दावणीला बांधणारा हा निर्णय होता. गोव्यातील दिवसेंदिवस प्रभावशाली होत असलेल्या संघकार्यालाच धक्का देणारा हा निर्णय होता.
सुवर्णसंधी गमावली!
गोव्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक उत्थानासाठी आणि विशेषत: ४५० वर्षांच्या पोर्तुगीज दास्यत्वाच्या मानसिक गुलामगिरीतून पुढच्या पिढ्यांना बाहेर काढून, एका विशिष्ट बलाढ्य कंपूने चालू ठेवलेली अराष्ट्रीयीकरणाची सतत वाढती प्रक्रिया कायमची गाडून टाकण्यासाठी मातृभाषा जागवण्याची येथे गरज होती. गोव्याच्या दृष्टीने उर्वरित राज्यांपेक्षाही, मातृभाषा रक्षणाची व पोषणाची मोठी आवश्यकता व प्राथमिकता होती. हा प्रश्न सामान्य नव्हता, गंभीर होता. २१ आमदार गोव्याने प्रथमच एकहाती निवडून देऊन भाजपाला सत्तेवर आणले होते. स्वयंभूपणे बनलेला भाजपा यावेळी मातृभाषा रक्षणासाठी कटिबद्ध न होता, तर मग हे कोण, कुठला पक्ष कधी करणार होता? स्वयंसेवकांची अपेक्षा भाजपाकडून नेमकी काय असायला हवी होती? गोव्याच्या बाबतीत हीच वेळ सर्वोत्तम होती. मातृभाषा आंदोलनात सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवरच तर यावेळी भाजपा निवडून आला होता. "आता नाही, तर कधीच नाही" याचा साक्षात्कार (उघड करण्याचे धाडस नसले तरी) आजतरी, आंदोलनावर अचानक लाथ मारून, "सत्ते"च्या राजकारणामागे, मातृभाषांशी प्रतारणा करून, राहिलेल्या भक्तगणांना झाला नसेल का ?
संघ कौतुकास पात्र ठरला होता!
कोकणप्रांत व केंद्रीय संघाच्या मान्यतेने जेव्हा गोव्यातील संघाने प्रत्यक्ष परिवार क्षेत्रापैकी एक असलेल्या भाजपालाच, पुन्हा आंदोलन सुरू करून ललकारले त्यावेळी गोव्यातील "मीडिया" आणि सर्वसामान्य गोवेकरांनी संघाच्या तत्वनिष्ठेची व सिद्धांत-बांधिलकीची तोंड भरून प्रशंसा केली होती. संघाशिवाय अन्य कोणीही असा निर्णय घेण्याचे धाडस करणार नाही, याबद्दल सामाजामध्ये, गोव्याच्या संघाबद्दलची विश्वसनीयता खूपच वाढली होती. प्रत्येक संघस्वयंसेवकाची संघाबद्दलची श्रद्धा स्वानुभवाच्या आधारावर दृढ झाली होती. संघाबद्दलची जनतेची विश्वासार्हता तावून सुलाखून निघाली होती. संघ कधीही तत्वांशी तडजोड करत नाही, करणार नाही, याचे ज्वलंत वस्तुनिष्ठ उदाहरण जनतेसमोर उभे राहिले होते! तत्वनिष्ठा हाच आदर्श मानणाऱ्या संघाचे आपण स्वयंसेवक आहोत, याचा कोण अभिमान व आत्मविश्वास सर्व स्वयंसेवकांना वाटला होता!
भाजपाच्या दडपणास बळी पडून, सप्टेंबर २०१६ पासून संघाने घेतलेल्या "यू टर्न"चा धक्का स्वयंसेवकांसाठी असहनीय होता. असा विपरित, विसंगत, तर्क-विसंगत निर्णय घेऊन मग "ताकाला येऊन भांडे लपवण्याचा" प्रयत्न करत संघाचे "एकचालकानुवर्तित्व" हे तत्व भंग झाल्याची ढोंगी ओरड कुणी करायची याचा अर्थ शिल्लक राहतो कुठे? संघस्वयंसेवक 'तत्व-भंग' करणाऱ्यांमागे अंधश्रद्धेने उभे राहावेत, याचसाठी का डॉ. हेडगेवारांनी एवढा अट्टहास केला?
आपापल्या सोयीसाठी, हवी तेव्हा, हवी तशी वापरण्यासाठी व वाकवण्यासाठी का तत्वांची निर्मिती संघाने केली? संघाचा हा कधीच हेतू नव्हता! संघाचा वैचारिक गाभा शाश्वत आहे! राजकीय कोष्टकांमुळे यंत्रणा भ्रष्ट होऊ शकते, याचा पुरेपूर अनुभव आम्ही गोव्यात आणि गोवा संलग्न असलेल्या कोकणप्रांतात घेतला व घेत आहोत!
संघयंत्रणेचे हे राजकीय पारतंत्र्य आणि तत्वाशी तडजोड सहन न होऊ शकलेले गोव्याच्या संघात ९५ टक्के कार्यकर्ते निघाले. १९६२ ते २०१६ या चोपन्न वर्षांत संघाच्या असंख्य प्रचारक व आदर्शस्वरूप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय तत्वांचे, विचारांचे जे संस्कार मनावर केले, त्यामुळे गोव्यातील काम हे कधीच व्यक्तिनिष्ठ व व्यक्तिपूजक राहिले नाही ते सर्वथा विचारनिष्ठ व सिद्धांतनिष्ठ राहिले. ही संघात घडलेली गोव्यातील संघकामाची व स्वयंसेवकांच्या मानसिकतेची जडणघडण विशेष आहे, खास आहे! संघ-यंत्रणेने भाजपाच्या दडपणासमोर सपशेल नांगी टाकून, केलेले "घूमजाव-तडजोड" कितीही सारवासारव, मखलाशी आणि संभावितपणाचा आव आणून पचवण्याचे प्रयत्न केले तरी संघविचारांच्याच निर्भेळ तालमीतून तयार झालेल्या स्वयंसेवकांमधील बहुसंख्यांच्या ती अंगवळणी पडू शकली नाही, हे वास्तव!
संघानेच मुरवलेली गृहितके
बौद्धिक वर्गातून वरिष्ठ कार्यकर्ते, प्रचारक, पदाधिकारी यांनी दोन गोष्टी सातत्याने सर्व स्वयंसेवकांसमोर मांडलेल्या सर्वांनाच आठवत असणार!
१. असंघटित हिंदू समाजाची व्याप्ती एवढी विशाल आहे की त्याला संघटित करण्यासाठी अनेक संघटना असायला हव्या होत्या. संघ एकटा, या प्रयत्नांसाठी पुरेसा नाही.
२. व्यक्तीपेक्षा संघटना श्रेष्ठ, संघटनेपेक्षा समाज श्रेष्ठ.
या दोन्ही गृहितकांच्या आधारावर, मनाच्या धारणा जर एकदम उलट दिशेने वाढायला लागल्या तर तो 'दोष' बनतो, ही वस्तुस्थिती! पुढील संबंधित दोन उदाहरणे!
१. संघाव्यतिरिक्त वेगळी संघटना, तेच विचार, तोच आचार, तेच आदर्श, तीच कार्यपद्धती स्वीकारून काम करायला लागली, तर आनंद झाला पाहिजे! तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला तर तो 'दोष' नव्हे? विचारसरणीला लागलेली कीड नव्हे?
२. एखादी संघटना वा संस्था विशिष्ट ध्येयसिद्धीसाठी जनतेशी, समाजाशी बांधिलकी जाहीर करते आणि नंतर मध्येच एखाद्या संकुचित स्वार्थासाठी सपशेल माघार घेते. याला, सर्वोच्चस्थानी मानल्या गेलेल्या समाजाशी प्रतारणा म्हणू नये तर काय?
वरील दोन्ही उदाहरणांमध्ये, ज्यांनी ही गृहितके आचरणात आणली, ते ही गृहितके निर्माण करणाऱ्याचे शत्रू क्र.१ कसे बनू शकतात? आंदोलनातून माघार घेतलेल्या आणि भाजपाशी, सत्तेशी एकनिष्ठ राहणे पसंत केलेल्या स्वत:ला स्वयंसेवक मानणाऱ्याला गोव्यातील विशिष्ट परिस्थितीत, जर आंदोलनाशी एकनिष्ठ राहिलेला व भाजपासमोर शरणागत न झालेला स्वयंसेवक शत्रू क्र. १ दिसायला, वाटायला लागला तर तो दोष कुणाचा? गोव्यात सध्या या तर्कदोषानेच "संघाला" ग्रासले आहे, कमजोर, हतबल केले आहे आणि त्याचबरोबर राजसत्तेवर अवलंबित बनवले आहे.