भाजपाने गमावले म्हापशातील दोन दिग्गज नेते; संघर्षाची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 07:29 PM2019-03-18T19:29:25+5:302019-03-18T19:29:53+5:30
सुमारे सव्वा महिन्याच्या कालावधीत म्हापशातील दोन दिग्गज नेत्यांच्या निधनाने पक्षाचा गड मानला जाणाऱ्या या तालुक्यात पक्षाच्या पुढील वाटचालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
म्हापसा : भाजपला सत्तास्थानी नेण्यास महत्त्वाचे योगदान देणाऱ्या बार्देस तालुक्यातील खास करुन म्हापशातील दोन दिग्गज नेते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या आकस्मीक निधनाचे परिणाम पक्षाच्या तालुक्यातील व राज्यातील पुढील वाटचालीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्माण झालेली पोकळीक भरून काढण्यासाठी पक्षाला कसरत करावी लागणार आहे.
सुमारे सव्वा महिन्याच्या कालावधीत म्हापशातील दोन दिग्गज नेत्यांच्या निधनाने पक्षाचा गड मानला जाणाऱ्या या तालुक्यात पक्षाच्या पुढील वाटचालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या नेत्यांनी दिलेल्या योगदानामुळे पक्ष शून्यातून सत्तेपर्यंत गेला, त्या नेत्यांच्या आकस्मीक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी पक्षाला खडतर प्रवास करणे भाग पडणार आहे. त्यात लोकसभेसोबत म्हापसा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार असल्याने या अल्प कालावधीत पक्षाला वाटचाल करणे एक दिव्य ठरणार आहे.
मूळ म्हापशातील पण पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मनोहर पर्रीकर यांनी पक्षाची वाटचाल शून्यातून सत्तेपर्यंत केली. भाजपची पहिली काही वर्षे वगळता १९९९ नंतर भाजपात प्रवेश केल्यापासून त्यांच्या सोबतीला दुसरे नेते फ्रान्सिस डिसोझा हे होते. दोघांनीही पक्षाची धूरा स्वत:च्या खांद्यावर झेलत सात मतदारसंघाचा समावेश असलेल्या बार्देस तालुक्यातून सुरुवातीला मगोपचे व त्यानंतर काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणीत पक्षाला सत्ता मिळवून दिली. २०१२ सालच्या निवडणुकीत तालुक्यातून ख्रिस्ती समाजाचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात भाजपचे स्थान त्यांच्या मनात निर्माण करुन या समाजातील तीन आमदार निवडून आणण्यास ते यशस्वी ठरले होते. त्यावेळी भाजपच्या आमदारांची तालुक्यातील संख्या सहा होती एक मतदारसंघ अपक्ष आमदाराच्या ताब्यात होता. त्यानंतर झालेल्या २०१७ सालच्या निवडणुकीत तीन आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला होता; पण ख्रिस्ती समाजातील तिन्ही आमदार निवडून आले होते.
२०१७ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारी लोकसभेची निवडणूक व म्हापसा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पक्षाची गेलेली पत पुन्हा मिळवून देण्याची क्षमता तालुक्यातील या दोन्ही नेत्यात होती. मतदारांचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवून देण्याची कुवत या नेत्यात होती; पण आकस्मीकपणे निर्माण झालेली ही पोकळी भरुन काढण्यासाठीची क्षमता असलेला एकही नेता पक्षाजवळ या तालुक्यातून नाही. जे होते त्यांचा पराभव झाल्याने सध्या तरी पक्ष कार्यापासून दूर राहिले असल्याने त्याचे विपरीत परिणाम येत्या निवडणुकीवर पडण्याची संभावना निर्माण झाली आहे. अशावेळी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.