भाजपचे नव्या मतदारांसाठी संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:32 AM2023-06-09T11:32:39+5:302023-06-09T11:34:14+5:30
हे संमेलन उत्तर गोवा दक्षिण गोव्याच्या स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजप युवा मोर्चाच्या वतीने नवीन मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी भर दिला जाणार आहे. अशा मतदारांसाठी विशेष संमेलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती युवा अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी दिली.
उत्तर गोवा पक्ष कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आतिश शेटगावकर तसेच रणजीत उसगावकर उपस्थित होते. केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवर येऊन ९ वर्षे पूर्ण झाल्याने भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. हे संमेलन उत्तर गोवा दक्षिण गोव्याच्या स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच उत्तर आणि दक्षिण गोव्यात दुचाकी रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. उत्तरेतील रॅलीचा प्रारंभ पेडणे मतदारसंघातून, तर दक्षिणेतील रॅली काणकोणातून सुरू होणार आहे. सर्व मतदारसंघांतून रॅलीची मिरवणूक काढण्यात आल्यानंतर दोन्ही रॅली एकत्रित होतील, अशी माहिती मांद्रेकर यांनी दिली.
काँग्रेस सत्तेवर असताना या पक्षाने दि. २५ जून रोजी देशभरात आणीबाणी जाहीर केली होती. या दिवसाचा निषेध करण्यासाठी प्रश्नमंजूषा आयोजित केली आहे. सर्व कार्यक्रम दि. ३० जूनपर्यंत होतील, असे मांद्रेकर यांनी सांगितले.