खासदारांनी शहांकडे जाताना डावलल्याने भाजपाचे मंत्री नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 12:05 PM2018-11-03T12:05:28+5:302018-11-03T12:15:02+5:30
गोव्याचा खनिज खाण प्रश्न घेऊन दिल्लीला जाताना सर्व चारही भाजपा मंत्र्यांना सोबत नेले जाईल, असे भाजपाच्या बैठकीत यापूर्वी ठरले होते.
पणजी : गोव्याचा खनिज खाण प्रश्न घेऊन दिल्लीला जाताना सर्व चारही भाजपा मंत्र्यांना सोबत नेले जाईल, असे भाजपाच्या बैठकीत यापूर्वी ठरले होते. तरी देखील भाजपाच्या खासदारांनी प्रत्यक्ष दिल्ली भेटीवेळी काही मंत्र्यांना डावलल्याने व गुपपूच दिल्लीला जाण्याचा प्रकार केल्याने भाजपाचे एक-दोन मंत्री खूप नाराज झालेले आहेत. एका मंत्र्याने तर यापुढे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत हा कथित बेशिस्तीचा विषय पोहचविण्याचे ठरविले आहे.
अलिकडेच भाजपाचे सगळे आमदार, मंत्री आणि भाजपाच्या कोअर टीमचे प्रमुख काही सदस्य यांची संयुक्त बैठक भाजपाच्या पणजीतील कार्यालयात झाली होती. गोव्याच्या खनिज खाणी जर लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरू झाल्या नाही तर दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा अडचणीत येईल असा इशारा बैठकीत मंत्री व काही आमदारांनीही दिला होता. त्यानंतर आम्ही दिल्लीला गोव्याचा खाणप्रश्न घेऊन जाऊया व प्रसंगी पंतप्रधान मोदींनाही भेटूया व त्यावेळी भाजपाचे चारही मंत्र्यांनी आमच्यासोबत यावे असे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बैठकीत जाहीर केले होते. मंत्री माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, निलेश काब्राल, मिलिंद नाईक, आमदार मायकल लोबो, ग्लेन तिकलो, प्रमोद सावंत आदी या बैठकीला उपस्थित होते.
पंतप्रधानांची भेट जर मिळाली नाही तर मग भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर किंवा कायदा मंत्र्यांना भेटूया असेही बैठकीत काही आमदार बोलले होते. तथापि, भाजपाच्या खासदारांनी अचानक शहा यांची भेट निश्चित केली व केवळ तिघेच जाऊन शहा यांना भेटल्याने भाजपाचे एक मंत्री खूपच संतापले आहेत. आम्ही भाजपामध्ये नाही काय, आम्ही भाजपाचे सदस्य नव्हे का की आम्ही कुणी परकी आहोत असा प्रश्न एका मंत्र्याने विचारला आहे. तूर्त आपले नाव उघड करू नका पण आपण योग्यवेळी पत्रकार परिषद घेईन, असे या मंत्र्याने काही पत्रकारांनाही सांगितले. मंत्री निलेश काब्राल यांना एकटय़ालाच दिल्लीला बोलविले गेले होते पण तेही केवळ एक दिवस दिल्लीला राहून मग शहा यांना न भेटताच माघारी आले. तसेच केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हेही शहा यांना भेटू शकले नाही. फक्त तेंडुकर, खासदार सावईकर व प्रमोद सावंत एवढेच शहा यांना व तोमर यांना भेटले. आपण यापुढे दिल्लीला जाईन तेव्हा शहा यांच्याकडे तक्रार करीन, जर भाजपाच्या बैठकीत ठरल्यानुसार कृती होत नसेल तर मग आम्ही बैठकांमध्ये सहभागी तरी का व्हावे असे एक मंत्री विचारत आहेत.
दरम्यान, उपसभापती मायकल लोबो हेही अस्वस्थ झालेले असून त्यांनी गोव्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका येतील व लोक सध्या राजकीय स्थितीवर खूप नाराज आहे असे सांगून भाजपाच्या दिशेने शाब्दिक बॉम्ब टाकला आहे. आमदार फ्रान्सिस डिसोझा व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तर भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकांना काही अर्थच राहिलेला नाही,असे म्हटले आहे.