भाजपा मंत्रिमंडळात पहिल्यांदाच बार्देस तालुका प्रतिनिधित्वापासून वंचित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:06 PM2018-09-24T17:06:54+5:302018-09-24T17:21:50+5:30

गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाचा बार्देस तालुका हा भाजपा सरकारातील मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वापासून वंचित राहिला आहे.

BJP ministers Francis D'Souza dropped from Manohar Parrikar cabinet in goa | भाजपा मंत्रिमंडळात पहिल्यांदाच बार्देस तालुका प्रतिनिधित्वापासून वंचित 

भाजपा मंत्रिमंडळात पहिल्यांदाच बार्देस तालुका प्रतिनिधित्वापासून वंचित 

Next

म्हापसा - गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाचा बार्देस तालुका हा भाजपा सरकारातील मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वापासून वंचित राहिला आहे. विद्यमान सरकारातील मंत्रिमंडळात तालुक्यातून भाजपाचे प्रतिनिधित्व करणारे पक्षाचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा हे एकमेव मंत्री होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. सात मतदारसंघ असलेल्या या तालुक्यात डिसोझा सहित भाजपाचे तीन आमदार प्रतिनिधित्व करीत आहेत. तीन ही आमदार हे ख्रिश्चन समाजातील आहेत. 

डिसोझा यांना डच्चू दिल्याने तालुक्यातील मंत्र्यांची संख्या चारवरुन तीनवर आली असून सरकारात असलेल्या इतर तीन मंत्र्यातील दोन मंत्री हे गोवा फॉरवर्ड पक्षातील आहेत. तर  एक मंत्री हा अपक्ष आमदार रोहन खंवटे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे डिसोझा हे गोव्यात भाजपाच्या प्रत्येक सरकारात मंत्री होते. पक्षासोबत सरकारात सुद्धा त्यांना मानाचे स्थान होते. 

२०१२ साली राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या सरकारात ते दोन नंबरवर अर्थात उपमुख्यमंत्रीपदी होते. त्यानंतर पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री झाल्यानंतर प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारात सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी होते. मंत्रिमंडळात असताना त्यांच्याजवळ कायदा मंत्री, शहर विकास मंत्री तसेच नगर नियोजन मंत्रीपदासारख्या महत्त्वाच्या खात्यावर सुद्धा काम केले आहे. 

डिसोझा यांनी मंत्रिमंडळातून तब्येतीच्या कारणास्तव वगळले जाणार असल्याची चर्चा तालुक्यातून सुरु होती. किमान महिन्यापासून ती सुरुच होती. कळंगुटचे आमदार उपसभापती मायकल लोबो यांनी सुद्धा खुद्द डिसोझा यांच्या अकार्यक्षमतेवर टिका  केली  होती. त्यांना वगळले तर त्यांच्या जागी दुसऱ्या आमदाराची निवड होणार किमान मायकल लोबो यांची निवड त्यांच्या जागी होणार ही असलेली अपेक्षा निलेश काब्राल यांची निवड झाल्यानंतर फोल ठरली. त्यामुळे तालुका प्रतिनिधित्वापासून वंचित राहिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे तालुक्यातून काहीसा नाराजीचा सूर भाजपा कार्यकर्त्यांकडून खास करुन व्यक्त ख्रिश्चन समाजातून व्यक्त करण्यात येत आहे. 

२०१२ साली तालुक्यातील भाजपा आमदारांची संख्या सहा होते व विधानसभेत भाजपाजवळ पूर्ण बहुमत सुद्धा होते.  २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातून भाजपाच्या आमदारांची संख्या सहावरुन घटून तीनवर आलेली, दोन मंत्री तथा एक आमदार पराभूत झाला होता. त्यानंतर राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी तालुक्यातील तीन आमदारापैकी फक्त एकाच अर्थात डिसोझा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली असली तर उपमुख्यमंत्रीपदावरुन मंत्रिमंडळातील त्यांचे स्थान व महत्व कमी होऊन चौथ्या नंबरावर आले होते. सरकारात हवी असलेली खाती सुद्धा त्यावेळी त्यांच्या पदरी पडली नसल्याने त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. 

कालांतराने त्याची तब्येत ढासळत गेल्याने मंत्रालयात सुद्धा जाणे त्यांनी कमी केले होते. मंत्री या नात्याने देण्यात आलेले सुरक्षा कवचही कमी करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात त्यांची खाती सुद्धा कमी करुन त्यांना  फक्त मंत्रिपदी कायम ठेवण्यात आले होते. तब्येतीमुळे एकदाही ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नव्हते. याच कारणास्तव त्यांनी काहीवेळी मुंबईत तर काहीवेळा विदेशात जाऊन  सुद्धा उपचार घेतले होते. सध्या ते अमेरिकेत उपचार घेत आहेत.  पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु असलेले उपचार पूर्ण करुन ते गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. 

Web Title: BJP ministers Francis D'Souza dropped from Manohar Parrikar cabinet in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.