कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेईन - डिसोझा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 01:20 PM2018-09-25T13:20:57+5:302018-09-25T13:23:27+5:30
मी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. माझा विश्वासघात झाला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलेन व पुढे काय करायचे ते ठरवेन, असे म्हापसा मतदारसंघाचे भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी सांगितले.
पणजी : मी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. माझा विश्वासघात झाला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलेन व पुढे काय करायचे ते ठरवेन, असे म्हापसा मतदारसंघाचे भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी सांगितले.
डिसोझा यांना सोमवारी पर्रीकर मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. ते आजारी असून अमेरिकेतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेले महिनाभर ते सरकारी काम करत नाहीत. त्यांच्याकडील खात्यांचा ताबा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आहे. अमेरिकेहून बोलताना डिसोझा म्हणाले, की आपल्याला म्हापसा मतदारसंघातील व बार्देश तालुका आणि अन्य भागांतील बऱ्याच भाजपा कार्यकर्त्यांचे फोन आले. मी म्हापशात असायचो तेव्हा रोज मला शंभर तरी लोक भेटण्यासाठी येत असे. प्रत्येकाला मी भेटत असे. गोवाभरातील लोक माझ्याकडे यायचे.
डिसोझा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये मी गोव्यात परतल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलेन. कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. मला मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याच्या निर्णयानंतर शेकडो कार्यकर्त्यांचे फोन मला आले. दोन-तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पर्रीकर हे एकदा माझ्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी मला मंत्रिमंडळातून वगळले जाईल अशा बातम्या येण्यास आरंभ झाला होता. त्यामुळे मी मला खरोखर वगळले जाणार आहे काय असे पर्रीकर यांना विचारले होते. वगळले जाणार असेल तर मला अगोदरच सांगा, माझी हरकत नसेल असे मी मुख्यमंत्र्यांना म्हटले होते. त्यावेळी तुम्ही अतिशय ज्येष्ठ मंत्री असून आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळातून का म्हणून डच्चू देणार असा उलट प्रश्न मला पर्रीकर यांनी विचारला होता. तुमच्यावर कसलाच आरोप नाही असेही पर्रीकर त्यावेळी म्हणाले होते. डिसोझा म्हणाले की, मला मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय हा गोवा प्रदेश भाजपाच्या कोअर टीमचा आहे. कोअर टीमचे कोणते सदस्य निरीक्षकांकडे काय बोलले हे मला ठाऊक आहे.