आमदारांचा एकच प्याला; दारूबंदीची मागणी अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 09:40 AM2024-08-01T09:40:17+5:302024-08-01T09:40:42+5:30
दारू बंदीची मागणी केली असेल तर त्यासाठी त्यांचे कौतुकच करूया. मात्र कलियुगात त्यांची मागणी कोण बरे ऐकेल?
भाजपचे काही आमदार अलिकडे विविध विधाने करून प्रचंड चर्चेत येऊ लागलेत. वादग्रस्त विधाने करून ते आपल्याच पक्षाला व काहीवेळा मुख्यमंत्र्यांनाही अडचणीत आणू लागलेत, काही भाजप आमदार सनबर्न, दारूबंदी वगैरेवर बोलून गोंयकारांचे छान मनोरंजन करत आहेत. कृषिमंत्री रवी नाईक यांनी आमदारांना करमणूक करण्याचे प्रशिक्षण वगैरे दिले की काय असा प्रश्न लोकांना पडतो. चाय पिया, सामोसा खाया असे पात्रांवचे डायलॉग मध्यंतरी गाजले होते. गोव्यात नळ कोरडे पडतात, पण रवी नाईक यांनी गोव्याहून पाणी आखातात निर्यात करता येते असा फॉर्म्युला मांडला होता. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी थोडे कुट्ट करा, असा सल्ला गोमंतकीयांना काजू फेस्तावेळी दिला होता. थंडी वगैरे झाली की कुट्ट करा, असा मंत्री गावडे यांचा दावा होता.
आमदार राजेश फळदेसाई यांनी आपल्या जुनेगोवे भागात मिनी सनबर्नचे आयोजन करा अशी मागणी करून खळबळ उडवून दिली होती. मंगळवारी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी वेगळे गणित मांडले. काही मंत्री व आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या विधानाने चक्रावले आहेत. गोव्यात दारू पिण्यावर बंदी लागू करावी पण दारूचे उत्पादन मात्र सुरू ठेवावे, अशी भूमिका शेट यांनी जाहीर केली. म्हणजे मद्याची हवी तेवढी निर्मिती करा पण ते पोटात ढकलू नका हा त्यांचा सल्ला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना जेव्हा ही मागणी कळली तेव्हा त्यांनी शेट यांना फोन केला, त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. गोवा पर्यटन राज्य आहे, शिवाय अनेक गोमंतकीय मद्य निर्मितीबरोबरच मद्य विक्रीच्या व्यवसायात आहेत. गोव्यात दारू बंदी लागू करावी ही भाजपची भूमिका नाही, याची कल्पना पक्षाने शेट यांना दिल्याची माहिती मिळते.
प्रेमेंद्र शेट यांच्याशी मुख्यमंत्री सावंतही नंतर स्वतंत्रपणे बोलले. कारण प्रेमेंद्र शेट यांनी अचानक केलेली मागणी म्हणजे भाजप व सरकार बेसावध असतानाच टाकलेला जबरदस्त शाब्दिक बॉम्ब आहे. शेट यांनी विकसित गोवा घोषणेचा मुद्दा नेऊन दारू बंदीशी जोडला व दारू अधिक स्फोटक केली. विकसित गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात दारू पिण्यास बंदी लागू करावी, असे शेट म्हणाले.
गुजरातसह चार राज्यांमध्ये दारू बंदी आहे, असाही संदर्भ प्रेमेंद्र यांनी दिलाय, वास्तविक शेट यांची मागणी आदर्श स्वरुपाची आहे असे कुणीही म्हणेल. त्यासाठी महिला वर्गाने आमदारांच्या भूमिकेचे स्वागत करायला हवे. मात्र ज्या राज्यात कॅसिनो जुगाराची केंद्रे खुलेआम चालतात, ज्या राज्यात सनबर्न व्हायलाच हवे म्हणून गोवा सरकार धडपडते, ज्या राज्यात ड्रग्जचा धंदा चालतो, पाटर्चामध्ये ड्रग्जचे व्यवहार चालतात, नाक्यानाक्यावर मटका चालतो, त्या राज्यात दारू पिण्यावर बंदी लागू करावी असे भाजप आमदाराने सुचवावे हे निश्चितच विनोदी वाटते. भाजप सरकारच्याच काळात कॅसिनोचा धंदा प्रचंड वाढला. त्यामुळे प्रेमेंद्र शेट यांनी कॅसिनो, सनबर्न, ड्रग्ज पार्ध्या या सर्वावर बंदी लागू करा अशी मागणी करायला हवी. मग यासोबत दारू पिण्यावरही बंदी लावा असे शेट यांनी सुचविले तर निश्चितच त्यांचा गोवेकर जाहीर सत्कार करतील. त्यांच्या धाडसाचे मग कौतुकही करता येईल.
भाजपच्या एका नेत्याने (जो आता भाजपमध्ये नाही) काही वर्षांपूर्वी मटका कायदेशीर करा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती. नंतर त्याने ती मागे घेतली हा भाग वेगळा. मुख्यमंत्री अनेकदा रामराज्याच्या, छत्रपती शिवरायांच्या व परशुराम भूमीच्या गौरवगाथा भाषणांमध्ये बोलून दाखवत असल्याने बिचाऱ्या प्रेमेंद्र शेट यांना कदाचित गोव्यात आदर्श राज्य अवतरले असावे असा भास होत असावा आणि त्या भासापोटीच त्यांनी पूर्ण दारू बंदीची मागणी केली असावी. तशी भावना असेल तर त्या भावनेचे कौतुक व स्वागतच करायला हवे. अति मद्य सेवनाने गोव्यात अनेकजण आयुष्यातून बरबाद होतात. अनेक गावांत अनेकजण व्यसनी बनून दारूपायी पैसे गमावतात, घरी पत्नींना मारझोड करतात, ही वस्तुस्थिती आहेच. प्रेमेंद्र शेट यांना त्याविषयी वाईट वाटत असल्याने त्यांनी दारू बंदीची मागणी केली असेल तर त्यासाठी त्यांचे कौतुकच करूया. मात्र कलियुगात त्यांची मागणी कोण बरे ऐकेल?