भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्षही ठरेल पक्षनिष्ठेच्या कसोटीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 12:40 PM2024-11-30T12:40:37+5:302024-11-30T12:40:56+5:30
परुळेकर, मांद्रेकरांचा पक्षाच्या नव्या धोरणाला पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी येत्या जानेवारीत निवडणूक प्रक्रिया होणार आहे. भाजपचे सर्व मंडळ अध्यक्ष तसेच सरचिटणीस हे पक्षनीष्ठांपैकीच असावे असे नवे धोरण भाजपने स्वीकारले आहे. या धोरणाचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर आदींनी जोरदार स्वागत केले आहे. नवा प्रदेशाध्यक्ष देखील पक्षनीष्ठांपैकीच असावा व पक्षनीष्ठेचीच पूर्णपणे कदर केली जावी अशी भूमिका परुळेकर, मांद्रेकर आदींनी घेतली आहे.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांनिमित्त प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. भाजप प्रभारी आशिष सूद हेही गोव्यात आले आहेत. बूथ समित्या निवडण्याचे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण होईल. नंतर मंडल समित्या व जिल्हा समित्या निवडल्या जातील. नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड जानेवारीच्या पूर्वाधात होऊ शकते. पदासाठी माजी मंत्री दिलीप परुळेकर व दयानंद मांद्रेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, दामू नाईक, माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर शर्यतीत आहेत.
पक्षाचे धोरण योग्य : दयानंद मांद्रेकर
माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पक्षाशी एकनिष्ठ व्यक्तीलाच प्रदेशाध्यक्षपद देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतला असेल तर त्याचे स्वागतच स्वा आहे. मीच एकमेव पक्षाशी सुरवातीपासून एकनिष्ठ आहे. चारवेळा आमदार म्हणून निवडून आलो. मंत्री म्हणूनही काम केले आहे. माझ्याकडे अनुभव आहे. पक्ष नेतृत्त्वाने संधी दिली तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा मी निश्चीतच स्वीकारीन. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मी होतो, तेव्हा पर्रीकरांनी १४ पूल बांधले. दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, लाडली लक्ष्मी योजना आमच्याच काळात सुरू झाल्या.
पक्षनिष्ठेची कदर करावीच : परुळेकर
दरम्यान, माजी मंत्री दिलीप परुळेकर म्हणाले की पक्षाच्या नव्या धोरणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी धोरणाचे स्वागत करतो. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जे कुणी पक्षनीष्ठ आहेत, त्यांना मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस अशी महत्त्वाची पदे मिळायलाच हवी. नवा प्रदेशाध्यक्ष देखील निवडताना पक्षनीष्ठा हाच मुख्य निकष असावा. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सतत केले की त्यांना महत्त्वाचे पद मिळते हे दाखवून देण्यास ही संधी आहे. एखादा नेता पक्ष सोडून गेला म्हणून त्याच्यासोबत मंडळ अध्यक्ष किंवा सरचिटणीस किंवा इतर कार्यकर्त्यांनी जाऊ नये. यासाठी नवे धोरण हे पूर्णपणे हिताचे आहे. पक्षनीष्ठेची कदर भाजपमध्ये होते असा मला विश्वास आहेच.
संघटनेमध्ये एकनिष्ठेच्या बाबतीत तडजोड नाहीच : महानंद अस्नोडकर
भाजपचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'जी तत्त्वे घेऊन पक्ष पुढे आलेला आहे, त्या तत्त्वांचे पालन व्हायलाच हवे. एकवेळ सरकार स्थापनेच्या बाबतीत मध्यंतरी काही तडजोडी झाल्या असतील. परंतु पक्ष संघटनेकडे एकनिष्ठतेबाबतीत कोणत्याही तडजोडी आतापर्यंत पक्षामध्ये झालेल्या नाहीत आणि यापुढेही होणार नाहीत.'
पक्षनीष्ठांनाच महत्त्वाच्या पदांवर संधी द्यावी असा निर्णय भाजपने राष्ट्रीय स्तरावर घेतला आहे. पक्षश्रेष्ठींनी मंडल अध्यक्ष, सर- चिटणीसपदी पक्षाकडे एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीचीच निवड करावी, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. हेच धोरण प्रदेशाध्यक्ष निवडीबाबतीतही लागू आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी शर्यतीत जे नेते आहेत, त्यापैकी परुळेकर, मांद्रेकर आदींची बाजू भक्कम झाली आहे. अर्थात सावईकर, दामू नाईकही पक्षनीष्ठच आहेत.