भाजपकडून आता 'नारीशक्तीचा गजर'; दक्षिण गोवा लोकसभेसाठी उमेदवाराचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2024 09:29 AM2024-03-05T09:29:15+5:302024-03-05T09:31:06+5:30
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने महिला उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने महिला उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. महिला उमेदवार म्हणून कदाचित केडरमधील किंवा भाजप हितचिंतकही असू शकेल, असे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिले. यावेळी त्यांनी निवडून येण्याची क्षमता हाच निकष असल्याचेही नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाने महिला उमेदवार शोधा, असे सांगितल्याने कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयावर आम्ही चर्चा केली. यापूर्वी आम्ही नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर व दामू नाईक अशी तीन नावे दक्षिण गोव्यातून पाठविलेली आहेत. कोणाचेही नाव केंद्रीय संसदीय मंडळाने फेटाळलेले नाही. आमदार दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर यांनी याआधीच आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्याने त्यांची नावे पाठविली नव्हती.
महिला उमेदवारांची नावे सुचविण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपचे पदाधिकारी, आमदार, मंत्री यांच्याशी चर्चा करून नावे पाठविली आतील. उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीतही जाहीर होऊ शकतो. कारण, ही प्रक्रिया दीर्घ स्वरूपाची आहे. आमच्यासाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकणे हाच उमेदवार निवडीचा प्रमुख निकष असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
छाननी समितीकडून नावे केंद्रीय संसदीय मंडळाकडे जातील व तिथूनच उमेदवार जाहीर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीसाठी आधी पाठविलेल्या तीन नावांबरोबरच महिला उमेदवारांची नावेही असतील. या महिला उमेदवार कोण? याबाबत कोअर कमिटीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल. पत्रकार परिषदेस भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.
तेंडुलकर यांनी पाच नावे वाचली
अशी माहिती प्राप्त झाली आहे की, कोअर कमिटीच्या बैठकीत माजी राज्यसभा खासदार तथा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी विनय तेंडुलकर यांनी सुलक्षणा प्रमोद सावंत, सविता रमेश तवडकर, सावित्री कवळेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजिता पे व आयोगाच्या माजी अध्यक्षा विद्या गावडे, अशी पाच नावे वाचली, परंतु, या नावांवर बैठकीत चर्चा वगैरे झाली नाही.
बैठकीत 'त्या' तिघांचेही मौन
कोअर कमिटीची बैठक सुमारे अर्धा तास चालली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व वाहतूकमंत्री माविन गुदिन्ही गोव्याबाहेर असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. दक्षिण गोव्यातून ज्यांची नावे तिकिटासाठी पाठविली होती ते नरेंद्र सावईकर, दामू नाईक तसेच बाबू कवळेकर हे तिघेही बैठकीला हजर होते. परंतु, त्यांनी मौन पाळले.
उमेदवारीसाठी महिलांचा विचार अत्यंत चांगली बाब
उमेदवारीसाठी महिलांचा विचार होणे ही अत्यंत चांगली बाब आहे, माझे नाव चर्चेत आहे व माझ्या कामाची दखल घेतली जाते याचे समाधान आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम असेल, पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याची माझी तयारी आहे. - सुलक्षणा सावंत
दामू नाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, 'माझ्यासाठी काल पक्ष श्रेष्ठ होता, आज आहे आणि उद्याही श्रेष्ठच राहील: एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. आमदार, मंत्री यांच्याशी चर्चा करून नावे पाठविली जातील. उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीतही जाहीर होऊ शकतो.
मी आशा सोडलेली नाही: बाबू कवळेकर
महिला उमेदवार देण्यासंबंधीच्या नव्या घडामोडीबद्दल बाबू कवळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, तिकिटाबद्दल मी अजून आशा सोडलेली नाही. माझा जनसंपर्क, प्रामाणिकपणे मी पक्षासाठी केलेली कामे, माझे कार्य तसेच मला मिळणारा पाठिंबा याची कदर पक्षश्रेष्ठी करतील याचा मला विश्वास आहे.