पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी; ५० हजारांपेक्षा जास्त लोक येण्याचा भाजपाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 12:45 PM2024-04-25T12:45:25+5:302024-04-25T12:47:16+5:30
लोकांची मोठी उपस्थिती लाभण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या २७ रोजी सांकवाळ येथे होणार असलेल्या जाहीर सभेला पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'मोदींच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे. मुरगाव तालुक्यातील भाजप आमदार दाजी साळकर, संकल्प आमोणकर, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो व कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वास हे विशेष जबाबदारी घेऊन सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पन्नास हजारांपेक्षा जास्त लोक सभेला येतील, अशी आमची खात्री आहे.'
तानावडे म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार बऱ्या तन्हेने पुढे जात आहे. घरोघर प्रचार सुरू झालेला आहे.' पत्रकार परिषदेस आमदार संकल्प आमोणकर व आमदार दाजी साळकर हेही उपस्थित होते. दरम्यान, भारतीय रिपब्लिकन पार्टीने (आठवले गट) भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून पक्षाचे गोवा प्रभारी बाळासाहेब बनसोडे यांनी पाठिंब्याचे पत्र तानवडे यांच्याकडे सुपूर्द केले.
प्रदेश भाजपचा जाहीरनामा २९ रोजी
प्रदेश भाजप आपला जाहीरनामा येत्या २९ रोजी जाहीर करणार असल्याचे तानावडे एका प्रश्नावर म्हणाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांनी जोरदार टीका केली. सावंत सरकारने ज्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दलची आश्वासने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतात, असे तानावडे म्हणाले.