भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत
By वासुदेव.पागी | Published: April 13, 2024 03:23 PM2024-04-13T15:23:27+5:302024-04-13T15:24:31+5:30
Lok Sabha Election 2024 : सभा कुडचडे येथे घेण्याचेही ठरले आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
पणजी : भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी केवळ पंतप्रधानाच्या होकाराच्या प्रतीक्षेत पक्ष आहे. 28 एप्रिल ते १ मे या दरम्यान ही सभा होऊ शकते. सभेसाठी जागा ही निश्चित करण्यात आली आहे. यावेळी गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
उत्तर गोव्यातील विजया बाबतीत भाजपला शंका नाहीत परंतु दक्षिण गोव्यात कोणत्याही परिस्थितीत जिंकणे हे प्रमुख लक्ष बनवीले आहे. त्यासाठी रणनीती ही ठरविण्यात आली आहे. पक्ष कार्यकर्त्यांना आणि मतदारांना विश्वास मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यात मोठी जाहीर सभा आयोजित करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ही सभा कुडचडे येथे घेण्याचेही ठरले आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
यासाठी पंतप्रधानाच्या होकाराची प्रतीक्षा पक्षाला आहे. पंतप्रधानांनी वेळ दिला तर ही सभा निश्चित घेतली जाणार आहे आणि ती यशस्वी केली जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दक्षिणेचा किल्ला सर करण्यासाठी भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. पक्षाच्या उमेदवार पल्लवी धेम्पे या मतदारांना भेटत आहेत. आमदार दिगंबर कामत हे त्यांच्या प्रचारात खूप सक्रिय झाले असून मडगाव आणि सासष्टीतील इतर भागातही त्यांनी धेंपे यांच्यासह प्रचार दौरे केले आहेत.
काँग्रेस पक्षाची या मतदारसंघात सर्व मदार सासष्टी तालुक्यातील मतदारांवर आहे. काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील दोन्ही आमदार युरिया आलेमाव आणि अल्टन दिकॉस्टा हे काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. त्यांनीही विशेष भाग हा सासष्टी तालुक्यावरच दिला आहे. शिवाय मुरगाव तालुक्यातूनही या पक्षाला आशा आहेत.